Join us

आठव्या दिवशीही सेन्सेक्सची भरारी कायम

By admin | Updated: January 28, 2015 00:11 IST

मुंबई शेअर बाजाराची सलग घोडदौड सुरूच असून, आज आठव्या दिवशीही बाजाराने गगनभरारी कायम ठेवत नवा उच्चांक गाठला आहे

मुंबई : मुंबई शेअर बाजाराची सलग घोडदौड सुरूच असून, आज आठव्या दिवशीही बाजाराने गगनभरारी कायम ठेवत नवा उच्चांक गाठला आहे. ३० शेअर असणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आज जोरदार उसळी घेत २९२.२० अंकांची वाढ नोंदवली आहे. मुंबई बाजाराचा निर्देशांक २९,५७१.०४ वर बंद झाला आहे, तर राजधानी दिल्लीतील निफ्टी बाजारानेही प्रगतीकडे घोडदौड कायम ठेवत ८९००ची पातळी प्रथमच गाठली.आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या वाढत्या प्रवाहामुळे बाजाराला अशी ऊर्जा मिळाली आहे. ग्रीसमधील निवडणुकीत काटकसरविरोधी पक्ष सिरीझा पार्टीला मिळालेल्या विजयामुळे आशिया खंडातील बाजार बहरले आहेत. युरोझोनच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ईसीबीने बाँड खरेदी प्रोत्साहन कार्यक्रम सुरू केल्यामुळे भारतातील परदेशी गुंतवणूक वाढण्याची आशा निर्माण झाली आहे, असे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तीन दिवसांचा भारत दौरा आज संपवला असून सौदी अरेबियाला प्रयाण केले आहे. ओबामा यांच्या या भेटीत अणुऊर्जा करारातील पेच सात वर्षांनंतर संपल्यानेही बाजारात उत्साह आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभराच्या उलाढालीत २९,४५१ पासून सुरू झाला व २९,६१८.५९ पर्यंत वर गेला. बंद होतानाही उच्चांक गाठत निर्देशांक २९,५७१.०४ वर बंद झाला. निर्देशांकात पडलेली नवी भर २९२.२० अंकांची असून, ती एक टक्का आहे. गेले आठ दिवस मुंबई शेअर बाजार सातत्याने चढत असून, निर्देशांकात एकूण भर २,२२४.२२ अंकाची आहे, ५० शेअरच्या निफ्टीमध्येही ७४.९० अंकांची वाढ असून, ती ०.०८५ टक्के आहे. निफ्टीचीही वाढ उच्चांकी असून दिवसभरात ८,९२५.१० वर पोहोचलेला निफ्टी बंद होताना ८९१०.५० वर बंद झाला आहे.