Join us  

दिल्लीतील सात ठिकाणी ईडीचे छापे, ‘स्टर्लिंग बायोटेक’वर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:51 AM

गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीशी संबंधित ५ हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राजधानी दिल्लीतील किमान सात ठिकाणी छापे मारले.

नवी दिल्ली : गुजरातमधील स्टर्लिंग बायोटेक कंपनीशी संबंधित ५ हजार कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राजधानी दिल्लीतील किमान सात ठिकाणी छापे मारले. कंपनीचे संचालक आणि सहयोगी यांच्या मालकीच्या स्थानांवर ही छापेमारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी मालकांच्या सहयोगींच्या प्रतिष्ठानांतून काही कागदपत्र आणि हार्डडिस्क व सीडी यांसारखे हार्डवेअर तपास पथकांनी जप्त केले आहे. निवासी आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या ७ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.अंमलबजावणी संचालनालयाने कंपनीविरुद्ध तसेच कंपनीचे मालक असलेल्या संदेसरा कुटुंबाविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. याच संस्थेविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केलेला असून, त्यानुसार हा गुन्हा अंमलबजावणी संचालनालयाने नोंदविला आहे.सीबीआयने स्टर्लिंग बायोटेक कंपनी तसेच कंपनीचे संचालक चेतन जयंतीलाल संदेसरा, दीप्ती चेतन संदेसरा, राजभूषण ओमप्रकाश संदेसरा, नितीन जयंतीलाल संदेसरा आणि विलास जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याशिवाय कंपनीचे लेखा परीक्षक हेमंत हाथी, आंध्रा बँकेचे माजी संचालक अनुप गर्ग आणि अन्य काही अज्ञात व्यक्तींविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला होता.५ हजार कोटी थकलेकंपनीने आंध्र बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहाकडून ५ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले होते. हे कर्ज कंपनीने फेडलेच नाही. त्यामुळे ते अनुत्पादक मालमत्तेत (एनपीए) गेले. ३१ डिसेंबर २0१६ रोजी कंपनीकडे एकूण थकीत रक्कम ५,३८३ कोटी रुपये होती. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर नोंदविला होता. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरची आता ईडीने दखल घेतली असून मनी लाँड्रिंगचा गुन्हा संबंधितांवर नोंदविला आहे. 

टॅग्स :नवी दिल्लीभारत