Join us  

खाद्य तेलाच्या किमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना मिळणार दिलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 7:38 AM

खाद्यतेलाच्या वाढत्या भावाला लगाम घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : खाद्यतेलाच्या वाढत्या भावाला लगाम घालण्यासाठी पाम तेलावरील आयात करात ५.५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे खाद्यतेल स्वस्त होईल.

खाद्य तेलावरील आयात करात मागच्या महिन्यातही सरकारने कपात केली होती. मागील वर्षभरात खाद्य तेलाच्या दरात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यावरून सरकारवर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने आयात कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या पाम तेलावरील आयात कर ३०.२५ टक्के होता. तो आता २४.७ टक्के करण्यात आला आहे. नवा दर ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहील. रिफाइंड पामतेलावरील आयात करही ४१.२५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के करण्यात आला आहे. रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेल यावरील कर ३० सप्टेंबरपर्यंत ४५ टक्क्यांवरून ३७.५ टक्के करण्यात आला आहे. तेलाच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर साठेबाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. तेलाची साठेबाजी केली जाणार नाही, याची खबरदारी घ्या, असे निर्देश सरकारने खाद्य तेल उत्पादक आणि घाऊक विक्रेते यांना दिले आहेत. 

टॅग्स :केंद्र सरकार