Join us  

Edible Oil Price Cut : खाद्यतेल 20 रुपयांनी स्वस्त होणार? MRP मध्ये बदल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 3:11 PM

Edible Oil Price Cut : खाद्य मंत्रालयाने बुधवारी घेतलेल्या खाद्यतेल कंपन्यांच्या बैठकीनंतर खाद्यतेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता सर्वसामान्यांना एक मोठी खुशखबर मिळणार आहे. खाद्य मंत्रालयाने बुधवारी घेतलेल्या खाद्यतेल कंपन्यांच्या बैठकीनंतर खाद्यतेल स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बैठकीत सर्व तेल कंपन्यांचा सहभाग होता. यावेळी खाद्यतेलाच्या किमतीत आणखी कपात करण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

एमआरपीमध्ये (MRP) बदल करण्याच्या सूचना सरकारने कंपन्यांना दिल्या होत्या. खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात दरात आणखी कपात होऊ शकते. सध्याच्या परिस्थितीत प्रति लिटर 20 रुपयांनी दर कमी करण्याचा सरकारचा अंदाज आहे. सरकारने बोलावलेल्या बैठकीत काही तेल कंपन्यांनी दर आणखी कमी करण्याचे मान्य केले आहे.

आंतरराष्‍ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्‍या किमती घसरल्‍यानंतर देशांतर्गत बाजारातही किंमती कमी होण्‍याचा अंदाज आहे. सरकारने तेल कंपन्यांना एमआरपीमध्ये कमी झालेल्या किमती सुद्धा रिफ्लेक्ट करण्यास सांगितले आहे. यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आश्वासन कंपन्यांना देण्यात आले आहे. या बैठकीला केंद्रीय खाद्य विभागाचे सचिव सुधांशू पांडेही उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत या घसरणीचा लाभ जनतेपर्यंत पोहोचावा, अशी सरकारची इच्छा आहे. तेलाच्या किमती 20 रुपयांनी कमी केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सरकारने गेल्याच दिवशी काही देशांनी खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातल्याची माहिती दिली होती. त्यामुळे त्याचा बंपर स्टॉक मिळाला. बंदी उठवल्यानंतर हे तेल बाजारात आले, तेव्हा भाव घसरले आहेत. दुसरीकडे सोयाबीनचे पीकही बाजारात येणार आहे.

लिटरमागे 15 रुपयांची घसरण झाली होतीगेल्या काही दिवसांत देशभरात शेंगदाणा तेल वगळता पॅकिंग केलेल्या खाद्यतेलाच्या किरकोळ किंमती 15-20 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यावेळी खाद्यतेलाची किंमत 150 ते 190 रुपये प्रति किलोदरम्यान घसरली होती. आता त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा दर  200  रुपयांच्या पुढे गेला होता.

टॅग्स :व्यवसायतेल शुद्धिकरण प्रकल्प