Join us  

अर्थव्यवस्था विकासदर राहणार 8.9 टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 5:26 AM

आयएचएस मार्किटचा अंदाज : अर्थव्यवस्थेत वाढ सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आगामी आर्थिक वर्षामध्ये (सन २०२१-२२) भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ८.९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेने गती घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर वेगवान बनल्याची माहिती समोर आली आहे.

आयएचएस मार्किट या संस्थेने केलेल्या पाहणीचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले असून, त्यामधून ही माहिती समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची वाटचाल चांगली सुरू असल्यामुळे सुधारणेचा वेग वाढत असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आयएचएस मार्किटने जाहीर केलेल्या अहवालामध्ये सन २०२०-२१ या वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत मोठी मंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अर्थव्यवस्थेला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या घसरणीचा मुकाबला करावा लागला. सप्टेंबर महिन्यापासून अर्थव्यवस्थेने थोडा -थोडा वेग घेतला. सन २०२०च्या चौथ्या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्था सुधारली आहे. या तिमाहीत औद्योगिक उत्पादन आणि उपभोग मूल्यामध्ये वाढ झालेली दिसून आल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीवरून देशाचे औद्योगिक उत्पादन ३.६ टक्के वार्षिक या दराने वाढले आहे. आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होत असल्याचे दृष्टोत्पत्तीस आले असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाचा जबर फटकामार्च महिन्यामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेची विक्रमी घसरण झाली. दुसऱ्या तिमाहीमध्ये घसरणीचा वेग काहीसा कमी झाला. सप्टेंबर महिन्यापासून उद्योगांवरील अनेक निर्बंध दूर झाल्यामुळे उद्योग सुरू होऊन उत्पादन प्रक्रियेस प्रारंभ झाला आणि अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर गतिमान होऊ लागली.