Join us  

आर्थिक घसरण सुरूच; विकासदर ५ टक्क्यांवर, मंदीमध्ये आणखी वाढ होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 6:05 AM

जागतिक व्यापारातील ताणतणाव आणि कमी झालेली देशांतर्गत मागणी यामुळे मंदीमध्ये आणखी वाढ होण्याची भीतीही बॅँकेने व्यक्त केली आहे.

मुंबई : देशभरातील तसेच परदेशातील मागणी कमी असल्याने चालू वर्षातील अर्थव्यवस्थेच्या विकास दराच्या अंदाजामध्ये रिझर्व्ह बॅँकेने मोठी कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर पाच टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तविला आहे. बॅँकेने यापूर्वी ६.१ टक्के अंदाज व्यक्त केला होता. आतापर्यंत अनेक आर्थिक अभ्यास करणाऱ्या संस्था आणि अर्थतज्ज्ञांनीही आर्थिक विकास दरात मोठी घसरण होत असल्याची शक्यता व्यक्त केली होती.

रिझर्व्ह बॅँकेच्या द्वैमासिक पतधोरणात देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकास दराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. बॅँकेने यापूर्वी विकास दराचा अंदाज ६.१ टक्के वर्तविला होता. तो कमी करून आता पाच टक्क्यांवर आणला आहे. दुसºया तिमाहीमध्ये उत्पादन तसेच अन्य क्षेत्रांमध्ये घट झालेली असल्याने जीडीपी ४.५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. पहिल्या तिमाहीमध्ये तो ५ टक्के एवढा होता.

जागतिक व्यापारातील ताणतणाव आणि कमी झालेली देशांतर्गत मागणी यामुळे मंदीमध्ये आणखी वाढ होण्याची भीतीही बॅँकेने व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे होणारे बदल दिसून येण्यासाठी काहीकाळ जावा लागेल, असे मतही दास यांनी व्यक्त केले. बॅँकांनी कंपन्यांना दिलेल्या कर्जामुळे अर्थव्यवस्थेमध्ये थोडी वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

चलनवाढीचा दर वाढण्याची भीती कांदा आणि टॉमेटोच्या दरांमध्ये झालेल्या मोठ्या भाववाढीमुळे चालू आर्थिक वर्षामध्ये चलनवाढीच्या दरामध्ये वाढ होण्याची भीती रिझर्व्ह बॅँकेने व्यक्त केली आहे. बॅँकेने याआधी चलनवाढीचा दर ३.५ ते ३.७ टक्के राहण्याची अपेक्षा वर्तविली होती. दुसºया सहामाहीमध्ये ही दरवाढ ४.७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. आता हा अंदाज ५.१ टक्के राहण्याची शक्यता बॅँकेने व्यक्त केली आहे.

याशिवाय मोबाइल कंपन्यांनी दरात मोठी वाढ करण्याचे ठरविले आहे. याशिवाय दूध, डाळी, सर्व भाज्या आणि साखरेचे भाव वाढत असल्यामुळेही चलनवाढीमध्ये वाढ होण्याची बॅँकेला भीती आहे. आॅक्टोबर महिन्यातील ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ६.९ टक्के झाला असून, हा ३९ महिन्यांतील उच्चांक आहे.यंदा ठेवला रेपो रेट कायमपतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी आतापर्यंत रेपो दरात रिझर्व्ह बँकेने पाच वेळा कपात केली होती. त्यामुळे यंदाही कपात केली जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, सध्या आम्ही तसे न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भविष्यात रेपो रेटमध्ये कपात होऊ शकते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक