नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसची नवी जोडणी (कनेक्शन) घेण्यासाठी आता तुम्हाला डीलर्सच्या दुकानांच्या पायऱ्या झिजविण्याची गरज नाही. घरबसल्या आॅनलाईन बुकिंगद्वारे नवे एलपीजी गॅस कनेक्शन तुम्ही घेऊ शकाल. पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांनी रविवारी या सेवेचा शुभारंभ केला. गॅस कनेक्शनसाठी आॅनलाईन बुकिंग सुविधा पुरविण्यासोबतच दोन किलोचा घरगुती वापराचा सिलिंडर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यावरही सरकारने विचार चालवला आहे. स्थानिक किराणा दुकानांमधून ग्राहकांना हा गॅस सिलिंडर मिळू शकेल. ही सेवा विशेषत: गावखेड्यांत राहणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल, असे सरकारला वाटते. गावखेड्यातील लोक पैशाअभावी १४.२ किलो वा ५ किलोचा सिलिंडर खरेदी करण्यात अनेकदा असमर्थ ठरतात. घरगुती वापरासाठीचा पारंपरिक सिलिंडर १४.२ किलोचा आहे. ४१८ रुपयांत मिळणारा हा सिलिंडर गरीब ग्रामीण लोकांच्या आवाक्याबाहेरचा आहे. त्यामुळे आॅक्टोबर २०१३ मध्ये सरकारने ५ किलोचा गॅस सिलिंडर बाजारात आणला होता. त्याची किंमत १५५ रुपये आहे.५ किलोच्या सिलिंडरला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता २ किलोचे सिलिंडर आणण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नव्या गॅससाठी ई-बुकिंग
By admin | Updated: August 30, 2015 22:02 IST