Join us

अवकाळी पावसाने पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By admin | Updated: November 18, 2014 00:01 IST

गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील तब्बल ४९ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे

पुणे : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील तब्बल ४९ हजार हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. भात, नाचणी, डाळिंब, द्राक्ष व काही प्रमाणात कांदा पिकाला फटका बसला असून, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. यंदा मान्सून उशिरा आल्याने पिकांची पेरणी लांबली होती. तसेच परतीचा पाऊसही झाला नसल्याने पिकांच्या उत्पादकतेवर व उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्र्तविण्यात येत होती. त्यातच अवकाळी पाऊस मान्सून सरींसारखा कोसळल्याने बळीराजाला तिहेरी फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून, येथील ३० ते ३२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नाशिकमधील डाळिंब, द्राक्ष, नाचणी, भात व काही प्रमाणात कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. द्राक्षांची छाटणी करण्याचे काम नाशिक जिल्ह्यात सुरू होते. पावसाने व पावसाळी वातावणामुळे घट कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच द्राक्ष पिकावर डावणी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असून, डाळिंब पिकाला तेल्या रोगाचा धोका आहे. तूर, हरभरा पिकासाठी हा पाऊस चांगला असून, विदर्भ व मराठवाड्यात या पावसामुळे दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)