Join us

भीतीच्या सावटामुळे दोन्ही निर्देशांक घसरले

By admin | Updated: September 19, 2016 05:10 IST

परकीय वित्तसंस्थांसह गुंतवणुकदारांनी केलेल्या प्रचंड विक्रीने शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

अमेरिकेतील व्याजदरामध्ये वाढ होण्याच्या शक्यतेने परकीय वित्तसंस्थांसह गुंतवणुकदारांनी केलेल्या प्रचंड विक्रीने शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये बाजारात खरेदीदार परतल्याने आधीची घट काही प्रमाणात भरून निघाली असली तरी सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक खालीच राहिले. यामुळे गेले दोन सप्ताह वाढत असलेला निर्देशांक खाली आलेला दिसून आला.गतसप्ताहाचा प्रारंभ नकारात्मक वातावरणामध्ये झाला. उत्तर कोरियाने केलेल्या अणुचाचण्यांमुळे जगभरातील राजकीय वातावरण चिंतेचे होते. त्यातच भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आलेल्या नकारात्मक बातम्या आणि अमेरिकेकडून व्याजदरामध्ये वाढ होण्याची व्यक्त होत असलेली शक्यता यामुळेही बाजार खाली आला. बाजारावर विक्रीचा मोठा दबाव होता. सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या खरेदीने आधीची घसरण काही प्रमाणात भरून निघाली असली तरी बाजाराची चढती भाजणी मात्र थांबलेली दिसून आली. बाजारात चारच दिवस व्यवहार झाले.मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये सप्ताहामध्ये १९८.२२ अंश म्हणजेच ०.६९ टक्कयांनी घट होऊन तो २८५९९.०३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८६.८५ अंश म्हणजेच ०.९८ टक्के कमी होऊन ८७७९.८५ अंशांवर बंद झाला. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारातील व्यवहारांची संख्याही मागील सप्ताहापेक्षा कमी दिसली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढीची शक्यता वर्तविली गेल्याने परकीय वित्तसंस्थांसह विविध गुंतवणुकदारांनी विक्रीचा पवित्रा घेतल्याने बाजारात मोठी घट झाली. >आठवड्यातील घडामोडीअमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या भीतीने बाजारात झाली मोठी घसरण, जुलै महिन्यात भारताच्या औद्योगिक उत्पादनामध्ये झाली घट, चलनवाढीच्या दरामध्ये झाली वाढ, सप्टेंबर महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याच्या शक्यतेने विक्रीचा दबाव, परकीय वित्तसंस्थांकडून बाजारामध्ये मोठी विक्री.