Join us

खराब रस्त्यांअभावी नियोजित बसेसच्या फेर्‍यांची पूर्तता नाही, हाजीमलंग पट्ट्यात केडीएमटीची सेवा ठरतेय कुचकामी

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या खिशाला चाट

विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या खिशाला चाट
डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील हाजीमलंग पट्ट्यातील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाल्याने त्याचा फटका महापालिकेच्या परिवहन विभागाला बसला आहे. खड्ड्यांमुळे या भागात जाणार्‍या वाहनांमध्ये तांत्रिक बिघाडांमुळे अपेक्षित फेर्‍यांची पूर्तता होत नसल्याने या भागातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
परिवहनच्या या भोंगळ कारभारामुळे येथील खासगी वाहतुकीचे फावले असल्याने नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या खिशाला चाट बसत आहे. कल्याण-हाजीमलंग या मार्गावर केडीएमटीची बससेवा असून दिवसाला साधारणत: ५० फेर्‍या होणे अपेक्षित असूनही पनवेलला जाणार्‍या बस सोडल्या तर या भागात जाणार्‍या केडीएमटीच्या बसफेर्‍यांची पूर्तता होत नसल्याचे आगार सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. याबाबत, डोंबिवली शहर शिवसेनाप्रमुख भाऊ चौधरी यांनीही या वृत्ताला दुजोरा देत रस्ते खराब असल्याचे स्पष्ट केले.
बसेस वेळेवर येत नसल्याने इच्छा नसतानाही खाजगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारत असल्याचे प्रत्यक्षदर्शी रमेश मेस्त्री यांनी सांगितले.
कोट :
खराब रस्त्यांमुळे परिवहनच्या बसफेर्‍या वेळापत्रकाप्रमाणे होत नाहीत. तसेच त्या पूर्णही होत नाहीत, हे सत्य आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे, हे मान्य आहे. मात्र, अनेकदा त्या खडतर मार्गातून गाड्या नेताना बे्रक जॅम, गाड्या फेल होणे अशा विविध तांत्रिक समस्यांनाही प्रशासनाला सामोरे जावे लागते. पनवेलला जाणार्‍या गाड्यांचा त्या फाट्यापर्यंत नागरिकांना उपयोग होत आहे. - एस. भोसले, आगार व्यवस्थापक, केडीएमटी