Join us  

लॉकडाऊनमुळे मे महिन्यातच तूट पोहोचली ५९ टक्क्यांवर; कर संकलनात मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 2:15 AM

देशातील आठ पायाभूत उद्योगांमधील उत्पादन सलग तिसऱ्या महिन्यामध्ये घटले आहे. मे महिन्यामध्ये या उद्योगांमधील उत्पादनामध्ये २३.४ टक्क्यांनी घट झाली

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये कर संकलनामध्ये मोठी घट झाल्याने अर्थसंकल्पीय तूट ही ६० टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे या वर्षामध्ये अर्थसंकल्पीय तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

देशाच्या महालेखापालांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मे महिन्याच्या अखेरीस ४ लाख, ६६ हजार ३४३ कोटी रुपये एवढी तूट आहे. ती अंदाजित तुटीच्या ५८.६ टक्के आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तूट ३६ टक्के होती.

मे महिनाअखेर सरकारला मिळालेला महसूल ४४,६६७ कोटी रुपये (२.२ टक्के) होता. मागील वर्षी याच कालावधीत महसूल ७.३ टक्के जमा झाला होता. पहिल्या दोन महिन्यांमध्ये ३३,८५० कोटी रुपयांचा कर महसूल जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये ७.९६ लाख कोटी रुपयांची तूट राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. ती जीडीपीच्या ३.५ टक्के राहण्याचा अंदाज होता.

देशातील लॉकडाऊनमुळे महसूल जमा होण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मात्र सरकारच्या खर्चामध्ये थोडीच घट झाली असल्याचे इकरा या पतमापन संस्थेच्या उपाध्यक्ष आदिती नायर यांनी स्पष्ट केले. पहिल्या दोन महिन्यांमध्येच तुटीमध्ये मोठी वाढ झाल्याने संपूर्ण वर्षामध्ये अर्थसंकल्पात अंदाजित केलेल्या तुटीमध्ये वाढ होऊ शकेल.पायाभूत उद्योगांमधील उत्पादन घटलेदेशातील आठ पायाभूत उद्योगांमधील उत्पादन सलग तिसऱ्या महिन्यामध्ये घटले आहे. मे महिन्यामध्ये या उद्योगांमधील उत्पादनामध्ये २३.४ टक्क्यांनी घट झाली असल्याचे उद्योग आणि व्यापार मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या मे महिन्यामध्ये या आठ पायाभूत उद्योगांच्या उत्पादनामध्ये ३.८ टक्क्यांनी वाढ झाली होती.

कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरणामधील घटक, पोलाद, सीमेंट आणि वीज या सात पायाभूत उद्योगांमधील वाढ ही शून्याच्या खाली आहे. केवळ खते या एकाच क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. सर्वाधिक घट पोलाद क्षेत्रामध्ये ४८.४ टक्के झाली आहे.

टॅग्स :केंद्र सरकारअर्थव्यवस्था