Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकरांच्या वास्तूची अखेर शासनाकडून खरेदी

By admin | Updated: September 25, 2015 00:08 IST

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडनमधील घर गुरुवारी महाराष्ट्र शासनाने अखेर विकत घेतले. या संबधीचा अंतिम करार लंडनमध्ये करण्यात आला.

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडनमधील घर गुरुवारी महाराष्ट्र शासनाने अखेर विकत घेतले. या संबधीचा अंतिम करार लंडनमध्ये करण्यात आला.
या घराच्या किमतीपोटी ३१ कोटी ३९ लाख रुपये घरमालकाच्या बँक खात्यात राज्य शासनाने जमा केले. शासनाकडून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाच्या खात्यामध्ये आणि तिथून घर मालकाच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली.
डॉ. आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना या घरात वास्तव्यास होते. ही वास्तू आता संग्रहालयामध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. याशिवाय भारतातून उच्च शिक्षणासाठी गेलेल्या गरीब व होतकरु विद्यार्थ्यांच्या निवासाचीही व्यवस्था तिथे केली जाईल. बाबासाहेबांची ग्रंथसंपदा देखील त्याठिकाणी असेल.
ही वास्तू खरेदी करण्याची सर्व प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केल्याबद्दल सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी समाधान व्यक्त केले. बाबासाहेबांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला शोभेल असे स्मारक त्या ठिकाणी उभारले जाईल, असे ते म्हणाले.
विधिमंडळाच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारने या वास्तूच्या खरेदीसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली होती. ही खरेदी राज्य शासन करणार की केंद्र, यावरून मध्यंतरी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, ही खरेदी राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस आणि बडोले यांनी स्पष्ट करुन संभ्रम दूर केला होता. (विशेष प्रतिनिधी)