Join us

करातून सुटका नाही

By admin | Updated: November 10, 2016 04:52 IST

बँकेत जमा करण्यात येणाऱ्या हजार-पाचशेच्या नोटांची करांतून सुटका होणार नाही. नोटा जमा करणारांना आयकर कायद्याचे नियम लागू राहतील

नवी दिल्ली : बँकेत जमा करण्यात येणाऱ्या हजार-पाचशेच्या नोटांची करांतून सुटका होणार नाही. नोटा जमा करणारांना आयकर कायद्याचे नियम लागू राहतील, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय झाल्यानंतर, आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावर डीडी न्यूजशी बातचीत केली. त्यांनी सांगितले, ज्यांच्याकडे हजार पाचशेच्या नोटा आहेत, त्यांनी त्या बँकेत जमा करायच्या आहेत. तथापि, एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवी की, ही काही कर सवलत योजना नाही. त्यामुळे नोटा बँकेत जमा केल्यास करांपासून कोणालाही सुटका मिळणार नाही. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयकर अधिकाऱ्यांची मोठ्या रकमांच्या जमांवर, तसेच बेकायदेशीर मार्गाने कमावलेल्या पैशांवर नजर राहील. त्यामुळे गृहिणी आणि शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कर सवलतीच्या मर्यादेत उत्पन्न असलेल्या गृहिणी आणि शेतकऱ्यांना कर व्यवस्थेकडून कोणताही त्रास होणार नाही. गृहिणी आणि शेतकरी २.५ लाख रुपयांच्या नोटा बँकेत जमा करू शकतील.