Join us

प्रत्येक मतदारसंघात सहा तपासणी पथके जिल्हा प्रशासनाची निवडणुक तयारी, प्रदीप पाटील

By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST





पुणे : निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात सहा तपासणी पथके तैनात करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी गुरुवारी दिली.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरु केली असून, बुधवारी त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यात पोलिसांसह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी वाहन परवाना, परिवहन विभागाची परवानगी, सभेची परवानगी यासाठी विविध पक्ष व कार्यकर्त्यांची लगबग सुरु होईल. या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्यात या साठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येक मतदारसंघात मतदार संघात एक खिडकी केंद्र सुरु करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या विषयी अधिक माहिती देताना अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, निवडणुक काळात मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप होण्याची शक्यता असते. त्यासाठी शहरातील व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन भरारी पथके व तीन स्थिर पथके नेमण्यात येणार आहे. या पथकात पोलिस, होमगार्ड, विक्रीकर विभाग, प्रशासनातील राजपत्रित अधिकार्‍यांची नेमनुक करण्यात येईल.
वाहन परवान्यापासून इतर परवाने एकाच ठिकाणी मिळावेत या साठी मतदारसंघ निहाय एक खिडकी केंद्र सुरु करण्यात येईल. त्यात पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी, वीज, परिवहन व महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी असतील. सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. तसेच निवडणुक प्रचारासाठी नदीपात्रात सभेला परवानगी दिली जाईल. मात्र वाहतुकीला अडथळा होऊ नये या साठी मुख्यचौक अथवा रस्त्यावर परवानगी दिली जाणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
---------------

दहा लाखांवरील प्रकरणे प्राप्तिकर विभागाला कळविणार


निवडणुकीच्या काळात भरारी पथकाकडून अनेकदा मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त केली जाते. मात्र अनेकदा व्यापार-व्यावसायाच्या रक्कमेचा देखील त्यात समावेश असतो. त्या पार्श्वभूमीवर दहा लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम तपासणीदरम्यान आढळल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्या खाली रक्कम आढळल्यास त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार पथकाला देण्यात आला आहे. मात्र या हस्तगत केलेल्या रक्कमेचा निवडणुकीशी काही संबंध आहे का याची खातरजमा पथकाला करावी लागेल. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
----------------------