Join us

बंद मागे घेण्याच्या मुद्यावर सराफा संघटनांत मतभेद

By admin | Updated: March 22, 2016 03:11 IST

दागिन्यांवर केंद्र सरकारने लावलेल्या उत्पादन शुल्कावरून पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्याच्या मुद्यावर सराफा संघटनांत मतभेद झाले आहेत.

नवी दिल्ली : दागिन्यांवर केंद्र सरकारने लावलेल्या उत्पादन शुल्कावरून पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्याच्या मुद्यावर सराफा संघटनांत मतभेद झाले आहेत. काही संघटनांनी बंद मागे घेतला असला तरी राजधानी दिल्लीत सोमवारी २0 व्या दिवशीही सोन्या-चांदीची दुकाने बंद राहिली. मुंबईतही काही दुकाने बंद होती.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही संघटनांनी बंद मागे घेतला होता. तथापि, काही संघटनांनी बंद मागे घेण्यास विरोध केला असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. आॅल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरिंदर कुमार जैन यांनी सांगितले की, राजधानी दिल्लीतील बंद सुरू राहणार आहे. प्रस्तावित अबकारी कर मागे घेतला जात नाही तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नाही. आपले आंदोलन तीव्र करण्यासाठी ज्वेलर्स, सोन्या-चांदीचे व्यापारी आणि कारागीर चांदी चौकात धरणे आंदोलन करण्याची तयारी करीत आहेत. शनिवारी जेटली यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काही प्रमुख सराफा संघटनांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली होती. आॅल इंडिया जेमस् अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन आणि जेमस् एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल यांचा त्यात समावेश आहे.