Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा कारखान्याच्या सभेत धक्काबुक्की, चप्पलफेक

By admin | Updated: September 29, 2014 23:14 IST


अभूतपूर्व गोंधळ : सभा गुंडाळली, विरोधकांना गेटवरच अडविले

कर्‍हाड : शिवनगर (ता़ कर्‍हाड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत विरोधकांना गेटवरच अडविल्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला़ सत्ताधारी व विरोधकांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की तसेच चप्पलफेक झाली़ हमरीतुमरीनंतर अवघ्या सात मिनिटांत सभा गुंडाळण्यात आली़ कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.
कृष्णा कारखान्याच्या कारभारावर टीका करत माजी अध्यक्ष डॉ़ इंद्रजित मोहिते यांनी पंधरा दिवसांपूर्वी कारखाना कार्यस्थळावर सभासदांसह जाऊन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने ८५ प्रश्न लेखी स्वरूपात विचारले होते़ त्यामुळे सोमवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी होण्याची शक्यता होती़ सकाळपासून कारखाना परिसरात तणावपूर्ण वातावरण होते़ कडक पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता़ माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक एकत्रितपणे सभेसाठी कार्यस्थळावर दाखल झाले़ तत्पूर्वी सभामंडपात सत्ताधारी गटाचे सभासद बसले होते़ मदनराव मोहिते व इंद्रजित मोहिते मंडपाच्या प्रवेशद्वारावर येताच त्यांना अडविण्यात आले़ त्यावरून त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली़ काही मिनिटांतच प्रतिघोषणा ऐकू येऊ लागल्या़ धक्काबुक्की, हमरीतुमरी करीत व्यासपीठाच्या दिशेने चप्पलफेक सुरू झाली़ अशातच मंजूर-मंजूरच्या घोषणा होऊन सभाही गुंडाळण्यात आली़ (प्रतिनिधी)
---------------
विरोधकांची प्रतिसभा
सत्ताधारी गटाने सभा गुंडाळल्याने आक्रमक झालेल्या विरोधी गटाने कारखान्याच्या प्रवेशद्वारावरच प्रतिसभा घेतली़ मदनराव मोहिते, डॉ़ इंद्रजित मोहिते यांनी सत्ताधार्‍यांवर कडाडून टीका केली़