Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौर पदासाठी १६ इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल भाजपकडून एकमेव उज्ज्वला देशमुख यांना उमेदवारी

By admin | Updated: September 7, 2014 00:04 IST

अकोला : महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी आठ इच्छुक उमेदवारांनी महापालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) सादर केले. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १६ उमेदवारांचे २२ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. भाजपच्यावतीने एकमेव उज्ज्वला देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.

अकोला : महापौर, उपमहापौर पदासाठी प्रत्येकी आठ इच्छुक उमेदवारांनी महापालिकेचे नगर सचिव अनिल बिडवे यांच्याकडे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) सादर केले. शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १६ उमेदवारांचे २२ अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. भाजपच्यावतीने एकमेव उज्ज्वला देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.
महापौर पदाचा कालावधी येत्या ९ सप्टेंबर रोजी संपुष्टात येत असल्याने नवीन महापौर निवडीसाठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण निघाल्याने इच्छुक नगरसेविका पुढे सरसावल्या. ६ सप्टेंबर रोजी महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच इच्छुकांमध्ये लगबग दिसून आली. सर्वात पहिला अर्ज उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मो.फजलू यांच्यावतीने सादर करण्यात आला. तर सर्वात शेवटचा अर्ज शिवसेनेच्या इच्छुकांनी सादर केले. महापौर पदासाठी विरोधीपक्ष भाजपच्यावतीने नगरसेविका उज्ज्वला देशमुख यांनी अर्ज दाखल केला. राकाँच्यावतीने शमशाद बेगम शे.फरीद, काँग्रेसच्यावतीने निहकत शाहीन अफसर कुरेशी, शाहीन अंजूम महबूब खान, साफीया आझाद खान, शे.रिजवाना अजीज शेख अजीज तसेच जैनबबी शेख इब्राहीम या पाच नगरसेविकांसह अपक्ष नगरसेविका हाजरा बी अब्दुल रशीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापौर पदासाठी आठ उमेदवारांकडून १२ अर्ज प्राप्त झाले. याप्रमाणेच उपमहापौर पदासाठी राकाँचे मो.फजलू अ.करीम, राजू मुलचंदानी, प्रफुल्ल भारसाकळ, समाजवादी पार्टीच्यावतीने नकीर खान, भारिप-बमसंच्यावतीने धनश्री अभ्यंकर तसेच शिवसेनेच्यावतीने विनोद मापारी, गायत्रीदेवी मिश्रा, योगिता पावसाळे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. आठ उमेदवारांकडून दहा अर्ज प्राप्त झाले. येत्या १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मनपाच्या मुख्य सभागृहात प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल.

बॉक्स...
राकाँच्या सभागृह नेत्याला सुचक मिळेना!
राकाँचे सभागृह नेता राजू मुलचंदानी यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज सादर केला. अर्जावर सुचक,अनुमोदकाचे नाव क्रमप्राप्त असल्याने त्यांनी भारिपचे गटनेता गजानन गवई यांना गळ घातली; परंतु पक्षश्रेष्ठींचा आदेश नसल्यामुळे गवई यांनी मुलचंदानी यांना नकार दिला. परिणामी सुचक, अनुमोदक शोधण्यासाठी सभागृह नेत्याला चांगलीच धावपळ करावी लागल्याची माहिती आहे.