Join us

बँक कर्मचा-यांच्या मागण्या केंद्र सरकारकडून बेदखल

By admin | Updated: November 7, 2014 04:37 IST

गेल्या अडीच वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करावी, या मागण्यांसाठी कर्मचारी वारंवार एक दिवसाचा संप करीत आहेत.

अहमदनगर : गेल्या अडीच वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ करावी, या मागण्यांसाठी कर्मचारी वारंवार एक दिवसाचा संप करीत आहेत. मात्र केंद्र सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारला जागे करण्यासाठी १२ नोव्हेंबरला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, या संपात दहा लाख कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती बँक कर्मचाऱ्यांच्या अखिल भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी दिली.बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचा नगर येथे गुरुवारी मेळावा झाला. या पार्श्वभूमीवर कुलकर्णी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, गेल्या २४ महिन्यांपासून बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी केंद्र सरकारशी चर्चा करीत आहोत.चर्चेच्या आतापर्यंत १९ फेऱ्या झाल्या आहेत. सरकार आश्वासने देत आहे, मात्र कृती काहीच करीत नाही. पगारवाढ, सेवाशर्ती, बँक व्यवस्थापन आदींबाबत निर्णय घेताना सरकारने बँक कर्मचारी संघटनेला विश्वासात घ्यावे. बँक व्यवस्थापनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे करार होऊ शकला नाही. म्हणूनच १२ नोव्हेंबरला दहा लाखांपेक्षा अधिक कर्मचारी एक दिवस लाक्षणिक संप करणारआहेत.ते म्हणाले, आवश्यक नोकर भरती, धोरणात्मक बदल, खासगीकरण, कामगार कायद्यात होत असलेला बदल,निवृत्ती वेतनासंदर्भातील प्रश्न यामुळे बँकिंग उद्योगात अस्वस्थता पसरली आहे. सर्व विषय मार्गी लागण्यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मोदी सरकारकडून आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या ‘कॉर्पोरेट फेव्हर’ असला तरी देशाच्या व बँकिंग उद्योगाच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची जागृती करण्यासाठी सोशल मीडियावर जागृती मंच कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याचे आतापर्यंत दोन लाख सदस्य झाले आहेत.