नवी दिल्ली : जून महिन्यात भारतातील एकूण कार विक्रीत ५.१८ टक्के घट झाली आहे. याच काळात प्रवासी वाहनांची विक्री मात्र २.६८ टक्क्यांनी वाढली आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) ही माहिती जारी केली आहे. सियामने म्हटले आहे की, जूनमध्ये २,२३,४५४ प्रवासी वाहने विकली गेली. गेल्या वर्षी याच महिन्यात २,१७,६२0 वाहनांची विक्री झाली होती. युटिलिटी वाहनांच्या विक्रीतील वाढीचा लाभ प्रवासी वाहनांना मिळाला आहे. युटिलिटी वाहनांच्या विक्रीत तब्बल ३५.२४ टक्के वाढ झाली. ५५,८५२ युटिलिटी वाहने जूनमध्ये विकली गेली. गेल्या वर्षी हा आकडा ४१,२७८ वाहने इतकाच होता. जूनमध्ये १,५४,२३७ कार विकल्या गेल्या. गेल्या वर्षी १,६२,६५५ कारची विक्री झाली होती. मारुती सुझुकीच्या कार विक्रीत १६.२५ टक्के घट झाली आहे. ७२,५५१ गाड्या मारुतीने विकल्या. मारुतीच्या युटिलिटी वाहनांची विक्री ७५.५१ टक्क्यांनी वाढून ९,७0८ गाड्यांवर गेली आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५,५३१ वाहने इतकाच होता. जूनमध्ये मारुतीच्या मानेसर प्रकल्पात आग लागल्याने गाड्यांत लावण्यात येणाऱ्या एअर कंडिशनरचा पुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे मारुती गाड्यांचे उत्पादन घटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
प्रवासी वाहनांची मागणी वाढली
By admin | Updated: July 13, 2016 02:31 IST