Join us
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने सोन्याला नवी झळाळी

By admin | Updated: September 27, 2014 07:05 IST

लग्नसराई व सणासुदीच्या खरेदीने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ५९० रुपयांनी उंचावून २७,५५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला

नवी दिल्ली : लग्नसराई व सणासुदीच्या खरेदीने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव ५९० रुपयांनी उंचावून २७,५५० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. नाणे निर्माते व औद्योगिक संस्थांच्या मागणीत वाढ झाल्याने चांदीचा भावही ५५० रुपयांनी वाढून ३९,००० रुपये प्रतिकिलो झाला.व्यापाऱ्यांनी सांगितले की, ‘नवरात्री’त आभूषण निर्माते व किरकोळ विक्रेत्यांनी जोरदार खरेदी केल्याने सोन्याच्या भावात तेजी नोंदली गेली. हिंदू धर्मपरंपरेनुसार, ‘नवरात्री’त सोने-चांदी, तसेच चांदीच्या शिक्क्यांची खरेदी शुभ मानली जाते. स्थानिक सराफ्यात आज सोन्याचा भाव ५९० रुपयांनी झेपावला. यापूर्वी २० जून रोजी सोन्याचा भाव ६०५ रुपयांच्या तेजीसह २८,६३५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला होता.मध्य-पूर्व आशियात तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात तेजीचा कल दिसून आला. तथापि, रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाल्याने सोन्याची आयात महाग झाल्यानेही तेजीचा कल राहिला. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ०.६ टक्क्यांनी वधारून १,२२८.५१ डॉलर प्रतिऔंसवर पोहोचला. चांदीचा भावही ०.८ टक्क्यांच्या तेजीसह १७.६६ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला.तयार चांदीचा भाव ५५० रुपयांनी वधारून ३९,९०० रुपये प्रतिकिलो व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ६८५ रुपयांनी वाढून ३९,५४० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. काल चांदीच्या भावात ६५० रुपयांची घट नोंदली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)