संजय खासबागे ल्ल वरुड (जि.अमरावती)विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला जाईल. सोबतच मोर्शी तालुक्यात संत्रा रस प्रक्रिया केंद्रही सुरू करू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.युती शासन जलयुक्त शेतशिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन देण्याचा प्रयत्न करीत आहे. सहा हजार गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. संत्र्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे, याकरिता राज्यातील १० शहरांमध्ये जागा उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी. सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या तरच शेतकऱ्यांचा विकास होईल. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ‘तुम्ही सुचवा आम्ही योजना देतो, मात्र आत्महत्या करु नका’ असे कळकळीचे आवाहन यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी केले. अधिकारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अनास्था दाखवित असेल तर अशा अधिकाऱ्यावर हंटर उगारला जाईल. कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असे ते म्हणाले.
‘वरूडमध्ये उभारणार डिहायड्रेशन प्रकल्प’
By admin | Updated: October 1, 2015 22:09 IST