Join us

निकृष्ट बियाणे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई

By admin | Updated: August 21, 2015 22:07 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व कृषिधन बियाणे कंपनीने दहीगाव गावंडे येथील शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री केल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांनी

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) व कृषिधन बियाणे कंपनीने दहीगाव गावंडे येथील शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री केल्याप्रकरणी या दोन्ही कंपन्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले यांनी शुक्रवारी दिले. महाबीजने १ लाख ९९ हजार ५०० रुपये तर कृषिधन कंपनीने १ लाख ५६ हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. बियाणे पेरणी केल्यानंतर ९० टक्के बियाणे उगवलेच नव्हते, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी केली होती.दहीगाव गावंडे येथील शेतकरी नरेश सुरेश काळे यांनी २०१४ च्या खरीप हंगामासाठी महाबीजकडून सुमारे ३३ हजार ३९० रुपयांच्या ३० किलो वजनाच्या १४ बॅग सोयाबीन बियाणे खरेदी केली होती. त्यांची पत्नी नयना नरेश काळे यांनी कृषिधन कंपनीकडून २२ हजार ५०० रुपयांच्या ३० किलो वजनाच्या ९ बॅग सोयाबीन बियाणे खरेदी केले होते.या अहवालाच्या आधारे नरेश काळे व नयना काळे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे धाव घेतली. ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष एस. एम. उंटवाले यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर नरेश काळे या शेतकऱ्याला महाबीज कंपनीने एक लाख ९९ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई व ३ हजार रुपये न्यायिक खर्च देण्याचे आदेश दिले. यासोबतच नयना नरेश काळे या महिला शेतकऱ्याला कृषिधन बियाणे कंपनीने एक लाख ५६ हजार रुपये नुकसान भरपाई व ३ हजार रुपये न्यायिक खर्च देण्याचे आदेश तक्रार निवारण मंचने दिले.या दोन्ही शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई व खर्च ४५ दिवसांच्या आतमध्ये देण्यात यावा, सोबतच ८ टक्के व्याजही देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचने दिले आहेत. या प्रकरणी शेतकऱ्यांतर्फे अ‍ॅड. जयेश गावंडे पाटील व अ‍ॅड. दिनेश पोरे यांनी, तर महाबीजतर्फे अ‍ॅड. मो. परवेज डोकाडिया यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)