Join us

सोन्याच्या आयातीत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2017 00:00 IST

नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात देशातील सोन्याच्या आयातीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे जाहीर झाले आहे.

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर डिसेंबर व जानेवारी महिन्यात देशातील सोन्याच्या आयातीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे जाहीर झाले आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर झालेल्या परिणामांची नोंद घेणारा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर ताबडतोब देशातील सोने तसेच सोन्याचे दागिने यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोने खरेदीच्या बदल्यात जुन्या नोटा देण्यास अनेकजण तयार होते. अशा सोने खरेदीसाठी जादा भाव देण्याचीही तयारी असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये मात्र देशातील सोन्याची आयात अनुक्रमे ५४.१ टन आणि ५३.२ टन अशी राहिली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशात ११९.२ टन सोने आयात करण्यात आले होते.अचानक झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशातील बाजारपेठेत चलन टंचाई निर्माण झाली. यामुळे सोने खरेदीवर मोठा परिणाम होऊन अनेक ठिकाणी ही खरेदी बरीच कमी झालेली दिसून आली. देशातील दागिने आणि रत्नांच्या खरेदीपैकी सुमारे ८० टक्के खरेदी ही रोखीत होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बाजारातील चलन टंचाईचा फटका या व्यवहारांना बसला असून, त्या मधून खरेदी कमी झाली आहे.सन २०१५-१६ मध्ये भारताने ९६८ टन सोन्याची आयात केली आहे. भारत हा जगातील सोने आयात करणारा एक प्रमुख देश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)