नवी दिल्ली : जागतिक बाजारातील घसरणीमुळे भारतात सलग तिसऱ्या व्यावसायिक सत्रात सोन्याचा भाव घसरला. राजधानी दिल्लीत १५0 रुपयांनी उतरलेले सोने २५,५५0 रुपये तोळा झाले. हा सोन्याचा गेल्या चार वर्षांतील नीचांक ठरला आहे. चांदीचा भाव मात्र १00 रुपयांनी वाढून ३४,३00 रुपये किलो झाला. स्थानिक पातळीवर ज्वेलरांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याचा फटकाही सोन्याला बसला. या उलट उद्योग क्षेत्राकडून असलेल्या मागणीचा लाभ चांदीला झाला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, अन्य जागतिक चलनाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचा भाव घसरला आहे. याशिवाय अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केली जाण्याची शक्यता वाढली आहे. त्याचाही विपरीत परिणाम सोन्यावर झाला आहे.न्यूयॉर्क येथील बाजारात सोन्याचा भाव काल ३.१४ टक्क्यांनी घसरून १,0९७.७0 डॉलर प्रति औंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १५0 रुपयांनी घसरून अनुक्रमे २५,५५0 रुपये आणि २५,४00 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. ८ आॅगस्ट २0११ रोजी सोने या पातळीवर होते. सोन्याच्या नाण्यांनीही घसरणीचा कल कायम ठेवला. ८ ग्रॅम गिन्नीचा भाव २00 रुपयांनी उतरून २२,५00 रुपये झाला.चांदीने बाजाराला थोडा दिलासा दिला. तयार चांदीचा भाव १00 रुपयांनी वाढून ३४,३00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ३५0 रुपयांनी उतरून ३३,९५0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ४९ हजार रुपये आणि विक्रीसाठी ५0 हजार रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याला उतरती कळा
By admin | Updated: July 21, 2015 23:24 IST