Join us  

बँकांच्या कर्जात घट; ठेवींमध्ये झाली ४.३३ लाख कोटींची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 12:43 AM

अतिरिक्त निधीची बॅँकांना चिंता; विविध पर्यायांवर विचार

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२०मध्ये बँकांनी दिलेली कर्जे घसरून १०२ लाख कोटींवर आली आहेत. त्याचवेळी बँकांकडे असलेल्या ठेवी वाढून १४३ लाख कोटी झाल्या आहेत. या वाढीव ठेवींचे काय करायचे, असा प्रश्न बँकांसमोर निर्माण झाला आहे.सूत्रांनी सांगितले की, कोविड-१९ महामारीमुळे बँकिंग क्षेत्रातील कर्जाची मागणी घटली असतानाच ठेवींचे प्रमाण वाढले आहे. कर्ज आणि ठेवींचे आदर्श गुणोत्तर ८०-९० टक्के असावे, असे मानले जाते. रिझर्व्ह बँकेने रेपोदर ४.२५ टक्क्यांवरून ४ टक्के केला असला तरी बँकांचा कर्ज प्रवाह १.४८ लाख कोटींनी घटला आहे.बँकांनी ठेवींवरील व्याजदर कमी करून २.७ ते ५.५५ टक्क्यांवर आणला आहे. तरीही लोक बँकांमध्येच पैसे ठेवण्यास प्राधान्य देत आहेत. २७ मार्च ते २२ मे या लॉकडाऊन काळात बँकांच्या ठेवी ४.३३ लाख कोटी रुपयांनी वाढल्या. २०१९-२० मध्ये घरगुती बचत १५.६२ लाख कोटी राहिली. २०१८-१९ मध्ये ती १३.७३ लाख कोटी होती.सूत्रांनी सांगितले की, एका बँकेच्या एका शाखेने विविध कारागीर आणि हस्तकलाकारांना कर्ज देता येऊ शकते का, यावर काम सुरू केले आहे. हे कर्ज कसे वसूल करता येईल, याचा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांचा क्लब स्थापन करून सल्ला घेतला जात आहे.अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचा क्लब स्थापन करून कर्जव्यवस्थेत सुधारणा केली जाऊ शकते. बँका अशिक्षित आणि अर्धशिक्षित छोट्या व्यावसायिकांना कर्ज देण्याचा पर्याय पडताळून पाहू शकतात.ठेवींबाबत मोठा प्रश्नखरे म्हणजे बँकांना मिळणाºया या ठेवी बँकांसाठी सोन्याची खाणच असतात; पण कोविड-१९ महामारीमुळे कर्जाला उठावच नसल्यामुळे या ठेवींचे करायचे काय, असा प्रश्न बँकांसमोर निर्माण झाला आहे. त्यावर बँका आपापल्या पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :बँकिंग क्षेत्र