Join us

कर्जमाफीने बिघडते शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2017 00:56 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे बँका आणि कर्जदार यांच्यातील शिस्त बिघडते, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी केले आहे.

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे बँका आणि कर्जदार यांच्यातील शिस्त बिघडते, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी केले आहे.उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे वचन दिले होते. महाराष्ट्रातही कर्जमाफी देण्याची मागणी होत आहे. तथापि, भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास विरोध केला आहे. भारतीय उद्योग महासंघाच्या एका कार्यक्रमात भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी बातचीत केली. त्याप्रसंगी त्यांनी यांनी म्हटले की, कर्जमाफीमुळे बँका आणि कर्जदार यांच्यातील शिस्त बिघडते. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या लोकांना पुन्हा कर्ज दिल्यानंतर माफीच्या आशेने ते कर्ज फेडीत नाही, असे दिसून आले आहे. माफीमुळे आज आम्हाला सरकारकडून कर्जाची परतफेड होईल. तथापि, त्यानंतर घेतलेले कर्ज लोक फेडणार नाहीत. ते दुसऱ्या निवडणुकीची वाट पाहतील. शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी. पण बँका आणि शेतकरी यांच्यात शिस्तही कायम राहायला हवी.देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एसबीआयने ट्रॅक्टरच्या कर्जांसाठी एकरकमी फेड योजना घोषित केली आहे. ही योजना तब्बल ६ हजार कोटी रुपयांची आहे. याशिवाय शिक्षण आणि लघु व मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जासाठीही एकरकमी परतफेड योजना बँकेने जाहीर केली आहे. भट्टाचार्य यांनी सांगितले की, दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या अशा इतरही अनेक कर्जांसाठी एकरकमी परतफेड योजना राबवित आहोत. एकरकमी परतफेड योजनेमुळे कर्जांची वसुली चांगली होत असल्याचा आमचा अनुभव आहे.