नवी दिल्ली : मोठ्या शहरातील गॅस वितरकांशिवाय ५ किलोचे एलपीजी सिलिंडर आता सर्व मोठ्या शहरातील निवडक पेट्रोल पंप आणि किराणा दुकानातही उपलब्ध होतील. आजवर १४.२ किलोचे स्वयंपाकासाठीचे गॅस सिलिंडर गॅस वितरकांकडेच मिळायचे. यासाठी ग्राहकांना बुकिंग करूनही कधी गॅस सिलिंडर मिळेल, यासाठी वाट पाहत वितरकाकडे खेट्याही माराव्या लागायच्या. आता यातून ग्राहकांची सुटका होईल.पाच किलोच्या छोट्या गॅस सिलिंडरसाठीही सरकार सबसिडी देत आहे. सबसिडीसाठी पात्र असलेले ग्राहक वर्षभरात ५ किलोचे ३४ गॅस सिलिंडर (१५५ रुपये प्रति ५ किलो सिलिंडर) खरेदी करु शकतात. पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी सुशासन दिनाचे औचित्य साधून ही योजना पुन्हा सुरू केली. यावेळी यासाठी देशभरातील जास्तीत जास्त दुकानांना या योजनेत सामील करण्यात आले आहे. ही काही नवीन योजना नाही. व्यापक विपणन योजनेसह पुन्हा ही योजना सुरू करीत आहोत. सबसिडीतील ५ किलोचे छोटे एलपीजीचे सिलिंडर वितरकांकडेच उपलब्ध असतील. तथापि, बाजार भावावर ५ किलोचे छोटे सिलिंडर पेट्रोल पंप, गॅस एजन्सी आणि निवडक किराणा दुकानातही उपलब्ध असतील, असे त्यांनी सांगितले.
किराणा दुकानातही मिळणार सिलिंडर
By admin | Updated: December 26, 2014 01:20 IST