Join us  

'Crypto King' ला 25 वर्षांचा तुरुंगवास अन् 11 अब्ज डॉलर्सचा दंड; जाणून घ्या प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 4:02 PM

Crypto किंग, Crypto चा पोस्टर बॉय, Crypto इंडस्ट्रीचा गोल्डन बॉय अशा नावांनी ओळखला जाणारा सॅम बँकमन फ्राइड याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.

Sam Bankman-Fried: काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरात Crypto Currency ची जोरदार चर्चा झाली. Crypto Currency एक आभासी चलन आहे, ज्याद्वारे लाखो-करोडो रुपयांची उलाढाल करता येते. अशातच, Crypto किंग, Crypto चा पोस्टर बॉय, Crypto इंडस्ट्रीचा गोल्डन बॉय अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा क्रिप्टो उद्योजक सॅम बँकमन फ्राइड याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. सॅमला क्रिप्टो उद्योगातील सर्वात मोठ्या फसवणुकीसाठी तब्बल 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सॅमविरोधात गेल्या वर्षभरापासून खटला सुरू होता. विशेष म्हणजे, हे प्रकरण काही लाख किंवा कोटींचे नव्हते, तर तब्बल 8 अब्ज डॉलर्स(6 लाख कोटी रुपये) च्या फसवणुकीचे आहे.

कोण आहे सॅम बँकमन फ्राइड ?सॅम बँकमन फ्राइड एकेकाळी क्रिप्टो उद्योगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता. तो फोर्ब्स 400 यादीत 41व्या क्रमांकांवर होता. तरुण वयात अब्जाधीश झालेल्या फ्राइडची संपत्ती 26.5 अब्ज डॉलर्स होती. MIT मधील भौतिकशास्त्राचा विद्यार्थी असलेल्या बँकमन फ्राइडने आपल्या करिअरची सुरुवात एका क्वांट फर्ममध्ये ETF ट्रेडिंगद्वारे केली, त्यानंतर 2017 मध्ये क्रिप्टो ट्रेडिंग सुरू केली. त्याने 2019 मध्ये क्रिप्टो एक्सचेंज एफटीएक्स लाँच केले. एकेकाळी क्रिप्टो ट्रेडिंगसाठी हे दुसरे सर्वात मोठे एक्सचेंज होते. 2022 च्या सुरुवातीस FTX आणि अमेरिकेतील त्याच्या ऑपरेशन्सचे मूल्य $40 अब्ज होते. फ्राइडने अल्मेडा रिसर्च नावाची एक हेज फंड फर्म देखील तयार केली आणि इथूनच त्याच्या अडचणी सुरू झाल्या.

नेमकं काय झालं?अचानक नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनीच्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात त्यांचे पैसे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर फ्राइडने FTX, FTX चे US ऑपरेशन्स आणि त्याची रिसर्च संस्था दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला. यानंतर नोव्हेंबरमध्ये फसवणूक आणि कट रचण्याच्या सात आरोपांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले. जूरीने हे सिद्ध केले की, फ्राइडने FTX च्या क्लायंटच्या पैशातून स्वतःसाठी लक्झरी मालमत्ता आणि खाजगी विमाने खरेदी केली. त्याने अमेरिकेतील निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणात देणगी दिली. याशिवाय, चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांना 1200 कोटी रुपयांहून अधिकची लाच दिल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

सॅम बँकमन फ्राईडने शिक्षा सुनावताना माफी मागितली. परंतु ज्युरी आणि न्यायाधीशांनी त्याचे एकही ऐकले नाही. अखेर त्याला 25 वर्षांचा तुरुंगवास आणि 11 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही शिक्षा कमीही होऊ शकते, कारण फ्राइडचे वकील अजूनही शिक्षेविरोधात अपील करू शकतात. दरम्यान, हा निर्णय क्रिप्टो उद्योगासाठी मोठा धडा मानला जात आहे.

 

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीव्यवसायगुंतवणूकआंतरराष्ट्रीयधोकेबाजी