Join us

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा घसरल्या

By admin | Updated: January 20, 2015 02:26 IST

गेल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेजी आल्यानंतर सोमवारी बाजार पुन्हा खाली आला. आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या.

सिंगापूर : गेल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेजी आल्यानंतर सोमवारी बाजार पुन्हा खाली आला. आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या.अमेरिकी तेल निर्देशांक असलेले वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटचा (डब्ल्यूटीआय) भाव ३ सेंटांनी घसरला. या तेलाचा फेब्रुवारीच्या डिलिव्हरीसाठी ४८.६६ डॉलर प्रतिबॅरल असा राहिला. ब्रेंट क्रूड आॅईलचा मार्चसाठीचा भाव ४१ सेंटांनी घसरून ४९.७६ डॉलर प्रतिबॅरल झाला. कमजोर मागणी आणि अतिरिक्त साठे यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण आहे. त्याचा फटका बसून भाव घसरले असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.अलीकडेच कच्चे तेल सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेले होते. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीने बाजारात तेजी परतेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या. फिलिप फ्यूचर्स यांनी एजन्सीच्या अंदाजावर भाष्य करताना म्हटले की, कच्च्या तेलाचे भाव वाढत आहेत, असे दिसत असले तरी ज्यामुळे भाव घसरले आहेत, ती परिस्थिती अद्याप जशास तशी कायम आहे. तेलाचा अतिरिक्त पुरवठा आणि कमजोर मागणी अजूनही कायम आहे. त्यामुळे किमती लगेचच वाढण्याची शक्यता धूसर आहे. जोपर्यंत परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत किमतींचा सध्याचा कल बदलणार नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रतिबॅरल १00 डॉलरपेक्षाही जास्त होत्या. त्या ५0 डॉलरच्या खाली घसरल्या आहेत. तेलाच्या दरात ५0 टक्क्यांपेक्षाही जास्त कपात झाली आहे. च्गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तेल उत्पादक देशांची (ओपेक) एक बैठक झाली. तेलाचे उत्पादन कमी करायचे नाही, असा निर्णय बैठकीत झाला. त्याचा परिणाम म्हणून तेल किमतीतील घसरणीचा वेग वाढला. च्फिलिप फ्यूचर्सचे गुंतवणूक विश्लेषक डॅनियल आंग यांनी सांगितले की, आता ओपेक देशांची पुढील बैठक येत्या जूनमध्ये होणार आहे. च्या बैठकीत तेल उत्पादनात कपात करण्याचा निर्णय होतो की नाही, यावर किमतींची पुढची दिशा अवलंबून असेल. तत्पूर्वी कच्च्या तेलाच्या किमती ४0 डॉलरपर्यंत घसरू शकतात, असा अंदाज आहे.