Join us

कच्चे तेल आणखी घसरले

By admin | Updated: January 15, 2015 06:04 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाने सहा वर्षांचा नीचांक गाठल्यानंतर बुधवारी त्यात आणखी घसरण झाली. बाजारात तेलाचा अतिरिक्त पुरवठा होत आहे

सिंगापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाने सहा वर्षांचा नीचांक गाठल्यानंतर बुधवारी त्यात आणखी घसरण झाली. बाजारात तेलाचा अतिरिक्त पुरवठा होत आहे. अशा स्थितीतही उत्पादनात अथवा पुरवठ्यात तेल उत्पादक राष्ट्रांकडून (ओपेक) कपात होण्याची शक्यता नाही. याचा परिणाम म्हणून तेल आणखी खाली गेले आहे. अमेरिकेतील बेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (डब्ल्यूटीआय) तेलाच्या फेब्रुवारीत डिलिव्हरी करावयाच्या किमतीत ३४ सेंटांनी घसरण झाली. या तेलाचे भाव प्रतिबॅरल ४५.५५ डॉलर असे झाले. ब्रेंट क्रूडच्या फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे भावही ४३ सेंटांनी कोसळून ४६.१६ डॉलर झाले. सिंगापूर येथील फिलीप फ्यूचर या कंपनीचे गुंतवणूक विश्लेषक डॅनियल अँग यांनी सांगितले की, ओपेककडून सध्याचे उत्पादन कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. जून २0१४ मध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १00 डॉलर झाल्या होत्या. त्यानंतर त्यात घसरण सुरू झाली.२७ नोव्हेंबर २0१४ रोजी ओपेक राष्ट्रांनी तेल उत्पादन घटवायचे नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे घसरणीचा वेग वाढला. सध्याच्या घसरणीला अमेरिकेकडून सुरू असलेले शेल आईलचे अतिरिक्त उत्पादन जबाबदार असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे. ओपेक सदस्य संयुक्त अरब अमिरातीचे ऊर्जामंत्री सुहैल अल-मझरुई यांनी सांगितले की, आम्ही आमचे उत्पादन कमी करणार नाही. किमती स्थिर करण्यासाठी अमेरिकेने शेल आॅईलचे उत्पादन आणि पुरवठा कमी करायला हवा.