Join us  

कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जची बँक गॅरंटी आयटा करू शकते वसूल; उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 3:52 AM

गेल्या महिन्यात कॉक्स अ‍ॅन्ड किंग्जने उधारीवर तिकिटे विकण्यावर आयटाने बंदी घातली होती

मुंबई : इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए-आयटा) विख्यात ट्रॅव्हल एजन्सी कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जने दिलेली बँक गॅरंटी परस्पर वसूल करू शकते, असा निकाल मुंबईउच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना न्यायालयाने याआधी बँक गॅरंटी वसूल करण्यावर दिलेला अंतरिम स्थगनादेश रद्द केला आहे. या प्रकरणात आपसात व्यापारी तडजोड करावी, अशी शिफारस कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जने केली होती. ती नंतर कंपनीने परत घेतली आहे.

गेल्या महिन्यात कॉक्स अ‍ॅन्ड किंग्जने उधारीवर तिकिटे विकण्यावर आयटाने बंदी घातली होती. कॉक्स अ‍ॅन्ड किंग्जने बाजारातून हुंडी-चिठ्ठीद्वारे हातउसने घेतलेल्या रकमांची परतफेड केली नाही म्हणून आयटाने ही बंदी घातली होती. त्याविरुद्ध दाद मागताना कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जने आयटाने बँक गॅरंटी परस्पर वसूल करू नये यासाठी अंतरिम स्थगनादेश मागितला होता, तो न्यायालयाने मंजूर केला होता. कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जची सहयोगी कंपनी ईझीगोलने सुद्धा बँक गॅरंटी वसुलीविरुद्ध स्थगनादेश घेतला होता. गेल्या आठवड्यात कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज व ईझीगोल या दोन्ही कंपन्यांनी आयटाचे एकूण देणे १०७ कोटी रुपये मंगळवारपर्यंत चुकते करू, असे कळवले होते. परंतु दोन्ही कंपन्यांनी हे आश्वासन पाळले नाही. बुधवारी दोन्ही कंपन्यांनी हे आश्वासन मागे घेण्याची परवानगी मागितली ती न्या. जी.एस. कुळकर्णी यांच्या एकलपीठाने मान्य केली.

बँक गॅरंटी वसूल करण्याची आयटाची कारवाई एकतर्फी व बेकायदेशीर आहे, कारण आम्हाला ग्राहकांनी तिकिटांचे पैसे दिले नाही म्हणून आयटाला आम्ही पैसे देऊ शकलो नाही, असा दावा कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जने केला. विमान कंपन्या सध्या अडचणीतून जात आहेत. त्यामुळे कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जकडे थकीत असलेले पैसे वसूल करून द्यावेत अशी विनंती विमान कंपन्यांनी आयटाला केली होती. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ही याचिका दाखल केली, असे आयटाने म्हटले आहे.स्वतंत्र संचालकांचा राजीनामाच्दरम्यान, कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जने १७४ कोटी रुपयांची देणी नव्याने चुकवल्यामुळे कंपनीचे स्वतंत्र संचालक सुभाषचंद्र भार्गव यांनी मंगळवारी राजीनामा दिला. परंतु कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जने मुंबई शेअर बाजाराला पाठविलेल्या पत्रात वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला, असे कळवले आहे.च्कॉक्स अ‍ॅण्ड किंग्जला गेल्या काही दिवसांपासून पैशाची चणचण जाणवते आहे. त्यामुळे कंपनीने २०० कोटींच्या आसपास कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी, कंपनीचे मत मानांकन (क्रेडिट रेटिंग) घसरले आहे. दरम्यान, कॉक्स अ‍ॅण्ड किंग्ज आपल्या कर्जदात्यांशी बोलणी करीत असून लवकरच सर्व सुरळीत होईल, असेही कंपनीने मुंबई शेअर बाजाराला कळविले आहे. 

टॅग्स :मुंबईउच्च न्यायालय