वडोदरा : विदेशात कामधंद्यासाठी गेलेले भारतीय दरमहा आई-वडील आणि जवळच्या नातेवाईकांसाठी गावाकडे न चुकता पैसे पाठवीत असतात. काही अनिवासी भारतीय विदेशात कमाई केलेला पैसा भारतामधील आपल्या गावातील बँक आणि टपाल कार्यालयात काही ठराविक मुदतीसाठी ठेव म्हणूनही ठेवतात. केरळमध्ये अनिवासी भारतीयांच्या ठेवीची रक्कम ९० हजार कोटींच्या घरात असली तरी गावपातळीवर तुलनेत गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील धरमाज गावाने केरळवर सरशी केली आहे. या गावात अनिवासी भारतीयांची १ हजार कोटी रुपयांची मुदतठेव आहे.धरमाज गावातील लोकसंख्या ११,३३३ असून या गावात बँकेच्या १३ शाखा आहेत. विदेशी गेलेले या गावातील लोक बँकेत आणि टपाल कार्यालयात नियमितपणे पैसा जमा करतात. अनिवासी भारतीयांच्या जमा रकमेच्या दृष्टीने धरमाज गाव देशांतील सर्वाधिक धनाढ्य गाव म्हणून ओळखले जात आहे.या गावातील अनिवासी भारतीय आपला पैसा सरकारी बँकेत ठेवणे पसंत करतात. त्यामुळे बँकेतील त्यांच्या ठेवीचा आकडा १ हजार कोटी रुपयांवर गेला आहे.विदेशी चलनाच्या वाढत्या ओघामुळे धरमाज गाव देशातील सर्वाधिक धनाढ्य आणि सुशिक्षित आहे.एवढेच नाही तर या गावातील ३ हजारांहून अधिक कुटुंबे मोठ्या ऐटीत राहतात, असे सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे वडोदरा परिक्षेत्राचे उप-सरव्यवस्थापक आर. एन. हिर्वे यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
देशातील धनाढ्य गाव
By admin | Updated: December 18, 2014 04:59 IST