राजरत्न सिरसाट, अकोलापाऊस रखडल्याने व सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या सांशकतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक पेरणीचे फेरनियोजन केले आहे. विदर्भात यंदा पाच ते सात लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच बीटी कापूस कंपन्यांनी राज्यात जवळपास दोन कोटी बीटीची पाकिटे उपलब्ध केली आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यातील कापसाचे क्षेत्र हे ४१.४६ लाख हेक्टर होते; परंतु उत्पादन खर्चाच्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्याने ते ३७ लाख हेक्टरपर्यंत घसरले. विदर्भात कापसाचे क्षेत्र कमी झाले असून, शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे लक्ष केंद्रित केले आहे. म्हणूनच सोयाबीन क्षेत्रात गतवर्षी राज्यात कधी नव्हे एवढी, म्हणजेच ३१.६२ लाख हेक्टरची भर पडली होती. सोयाबीन क्षेत्राची सर्वाधिक १७.७७ लाख हेक्टर एवढी वाढ, कापूसपट्टा म्हणून ओळख असलेल्या पश्चिम विदर्भात झाली. विदर्भात एकूण २१.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले.त्यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याने, त्यांना बियाण्यांची उगवणशक्ती तपासावी लागत आहे. परिणामी शेतकरी कापूस पिकाकडे वळला आहे. यंदा विदर्भातील कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, त्यासाठी आम्ही देशी कापूस वाणाचे नियोजन केले आहे, असे कापूस संशोधक डॉ. ए. एन. पसालावार यांनी सांगितले.
विदर्भात पुन्हा कापसाचा पेरा वाढणार
By admin | Updated: June 23, 2014 05:15 IST