सिंगापूर : आशियात तेलाच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली असून, गेल्या सात वर्षांतील नीचांक पातळीवर तेलाचे दर घोंगावत आहेत. अमेरिकी तेल साठ्याची यादी जारी होण्याआधी आणि व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. तेलाच्या किमतीतील घसरण भारताच्या दृष्टीने दिलासजनक बाब आहे.बाजारात मुबलक साठा असतानाही तेलाचे उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकने उत्पादन कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. इराणचाही उत्पादन कमी करण्याचा इरादा नाही. परिणामी, तेलाच्या किमती घसरत आहेत. अमेरिकेत जानेवारीत वितरित करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ३७.८१ डॉलर, तर ब्रेन्ट क्रूडचा भाव प्रति बॅरल ४०.९९ डॉलर होता. न्यूयॉर्कमध्ये तेलाचा भाव प्रति बॅरल ३७.६५ डॉलर होता.अमेरिका उद्या तेलसाठ्याची स्थिती घोषित करणार आहे. त्यामुळे वायदे बाजारावर त्याचा काहीसा परिणाम होताना दिसत आहे. अमेरिकेतील तेल साठ्याची स्थिती पाहता मागणीच्या तुलनेत तेलाची गरज भागेल, असे संकेत ब्लूमर्ग न्यूज सर्व्हेने दिले आहेत. तसेच अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या खुल्या बाजार समितीच्या बैठकीकडे व्यापाऱ्यांचे लक्ष आहे. पुढच्या आठवड्यात ही बैठक होत असून, नऊ वर्षांनंतर पहिल्यांदाच व्याजदर वाढविण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किमती सात वर्षांच्या नीचाकांवर
By admin | Updated: December 8, 2015 23:44 IST