Join us  

'कोरोना'मुळे अंबानी, अदानी झाले 'गरीब'; बघा, किती कोटींनी घटली संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 10:53 AM

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत बाजारात झालेली घसरण दुसऱ्या क्रमांकाची आहे

मुंबई - जगातील अनेक देशांत कोरोनाचा झालेला संसर्ग, जगातील शेअर बाजारांत झालेली घसरण, परकीय वित्तसंस्थांकडून मोठी विक्री आणि मुडीजने घटविलेला जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज यांमुळे मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार घसरण झाली. बाजाराचा निर्देशांक सुमारे १४५० अंशांनी खाली आला. गेले सहा दिवस होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामध्ये देशातील बड्या उद्योगपतींचाही समावेश असून त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. 

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत बाजारात झालेली घसरण दुसऱ्या क्रमांकाची आहे. शुक्रवारी बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स ७०० अंशांनी खाली येऊन ३९,०८७.४७ अंशांवर खुला झाला. त्यानंतर तो १५२५ अंशांपर्यंत खाली गेला आहे. तर, देशातील नामवंत उद्योजकांनाही मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. 

देशातील आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजक/ व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींना 5 बिलियन्स डॉलर म्हणजे 5 अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. यंदाच्या वर्षात त्यांच्या संपत्तीत एवढी मोठी घट झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनाही 884 दशलक्ष डॉलरचे नुकसान सहन करावे लागणार आहे. तसेच, आयटी क्षेत्रातील नामवंत अझीम प्रेमजी यांच्या संपत्तीतही 869 दशलक्ष अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. तर, अदानी यांनाही केवळ 2 महिन्यात 496 दशलक्ष डॉलरचा फटका बसला आहे.  

उदय कोटक आणि सन फार्माचे दिलीप संघवी यांनाही मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. विशेष म्हणजे या सर्वच उद्योजकांना गेल्या 15 दिवसांतच सर्वाधिक आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक जवळपास 3000 अंकांनी कमी झाला आहे. 12 फेब्रवारीपासून होत असलेली निर्देशांकांची घसरण अद्यापही सुरुच आहे. शेअर बाजारातील दलालांनाही कोरोना व्हायरसमुळे नुकसान झाले आहे. गुंतवणुकदारांच्या खिशातील 11.52 लाख कोटी रुपयांची संपत्ती गायब झाली आहे.  

मुडीजने घटविला अंदाजकोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेलाही धक्का बसण्याची शक्यता आहे. मुडीज या आंतरराष्ट्रीय पतमापन संस्थेने जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा आगामी वर्षामध्ये २.८ ऐवजी २.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुडीजच्या या अंदाजाचाही जगभरातील शेअर बाजारांवर प्रतिकूल परिणाम झाला. यामुळे एकाच दिवसामध्ये गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोना विषाणूने आता जगालाच आपल्या कवेत घेण्यास प्रारंभ केल्याने जगभरामध्ये भीतीचे वातावरण आहे. या भीतीने आशियातील सर्वच शेअर बाजारांमध्ये तीव्र घसरण झाली. टोकिओ, सिडनी, सेऊल, बॅँकॉक आदी शेअर बाजारांमध्ये तीन टक्क्यांची घसरण झाली. याआधी अमेरिका व युरोपमधील शेअर बाजारही घसरले. युरोपातील निर्देशांक चार टक्क्यांनी घसरले.

दरम्यान, चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने जगभरात पाय पसरले आहेत. जगभरात आतापर्यंत २,८०० लोकांचा मृत्यू झाला असून ८३ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. प्रत्येक देशाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये संसर्ग झालेल्या ७८ हजार ८२४ पैकी २,७८८ लोक दगावले आहेत. सर्वाधिक मृतांची संख्या हुवेई प्रांतातील आहेत. हाँगकाँगमध्ये विषाणूबाधित ९२ रुग्णांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने या संसर्गजग्य रोगाला ‘कोविड-१९’ असे नाव दिले आहे. 

टॅग्स :कोरोनामुकेश अंबानीअझिम प्रेमजीनिर्देशांक