Join us  

Coronavirus: जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 8:26 AM

यासाठी एटीएम मशीनवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल, त्यानंतर ती रक्कम तुमच्या मोबाइलवर टाकावी लागेल.

नवी दिल्ली – चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १९० हून अधिक देशांना फटका बसला आहे. जगात ६५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोकांनी सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं असं आवाहन वारंवार करण्यात येते. आता कोरोना व्हायरसपासून ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी बँका पुढे सरसावल्या आहेत.

लवकरच देशातील बर्‍याच मोठ्या बँका आता कॉन्टॅक्टलेस एटीएम मशीन (Con-tactless ATM Machine) बसवण्याची तयारी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, एटीएम टेक्नॉलॉजीवर काम करणाऱ्या एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजी (AGS Transact Technologies) या कंपनीने नवीन मशीन तयार केली आहे. यामध्ये ग्राहक आपल्या मोबाइल अ‍ॅपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून पैसे काढू शकतील.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एटीएम कार्ड्समध्ये सध्या मॅग्नेटिक स्ट्राइप असते. यामध्ये ग्राहकांचा संपूर्ण डेटा असतो. हा डेटा एटीएममध्ये पिन क्रमांक टाकल्यानंतर डेटा पाहते. यानंतर, ग्राहकाला पैसे काढण्याची परवानगी दिली जाते. आता बँका कॉन्टॅक्टलेस एटीएम मशीन घेऊन येत आहेत. या मशीनमध्ये ग्राहक एटीएम मशीनला हात न लावता, त्यांच्या मोबाईल फोनद्वारे रोख रक्कम काढू शकतात.

यासाठी एटीएम मशीनवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल, त्यानंतर ती रक्कम तुमच्या मोबाइलवर टाकावी लागेल. त्यानंतर रक्कम एटीएममधून बाहेर येईल. कॉन्टॅक्टलेस एटीएम मशीनची माहिती देताना एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीचे सीटीओ महेश पटेल (AGS Transact CTO Mahesh Patel) यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, क्यूआर कोडद्वारे रोख रक्कम काढणे(QR code-based withdrawal) खूप सुरक्षित आणि सोपे आहे. कार्ड क्लोनिंग करण्याचा कोणताही धोका नाही. तसेच, अतिशय वेगवान सेवा आहे. रक्कम फक्त २५ सेकंदात काढता येईल, असेही एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीचे सीटीओ महेश पटेल यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसच्या या संकट काळात फिजिकल डिस्टंन्स आणि सॅनिटायजेशन खूप महत्त्वाचे आहे. पुरेशी स्वच्छता आणि जागरूकतेचा अभाव असल्यामुळे एटीएम मशीनद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत कॉन्टॅक्टलेस एटीएम मशीन ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकेल. त्यामुळे काही मोठ्या बँकांनी कॉन्टॅक्टलेस एटीएम मशीन बसविण्याचा विचार केला आहे. दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क लावणं हे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याएटीएमबँकमोबाइल