Join us  

Corona Virus: जागतिक अर्थव्यवस्थेला बसेल दोन ट्रिलियन डॉलरचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 5:17 AM

संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार परिषदेचा अंदाज : कोरोना व्हायरसचा फैलाव

संयुक्त राष्ट्रे : जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दोन ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा फटका बसण्याचा अंदाज असून, जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर २.५ टक्क्यांच्या खाली येण्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेने व्यक्त केली आहे. या व्हायरसमुळे काही देशांमध्ये मंदी येण्याची भीतीही या संस्थेने व्यक्त केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेचे संचालक रिचर्ड कोझुल - राईट यांनी सांगितले की, गतवर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जागतिक अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलरचा फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रसार बघता जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना यामुळे फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुधारित अंदाजानुसार या व्हायरसच्या उद्रेकाने जागतिक अर्थव्यवस्थेचे दोन ट्रिलियन डॉलरचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावणार असून, तो २.५ टक्क्यांपेक्षा कमी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. या व्हायरसमुळे चीन वगळता अन्य विकसनशील देशांना २२० अब्ज डॉलरच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. तेल निर्यातदार देशांना याचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थांचा विकास दर सुमारे एक टक्का कमी होण्याची भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली.

कोरोनाच्या प्रसारामुळे मानवी जीविताचे होणारे नुकसान हे मोठे असून, त्यामुळे उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. याशिवाय उत्पादनप्रक्रिया थांबल्यामुळे काही देशांच्या अर्थव्यवस्थांना मंदीचा तडाखा बसण्याची भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. विविध देशांच्या सरकारांनी आत्ताच आपल्या नागरिकांना याबाबत सावध केल्यास त्यांच्याकडून मंदीला प्रतिबंध करण्यासाठी काही उपाय सुरू केले जाऊ शकतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.भारताचे ३४८ दशलक्ष डॉलरचे नुकसानकोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे चीनमधील उत्पादन ठप्प झाले असताना भारतीय अर्थव्यवस्थेलाही यामुळे ३४८ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे नुकसान सोसावे लागण्याचा अंदाज या संघटनेने मागील आठवड्यात व्यक्त केला होता. जगभरातील ज्या प्रमुख १५ अर्थव्यवस्थांना नुकसान सोसावे लागणार आहे त्यामध्ये भारताचा समावेश आहे. चीनमधील उद्रेकामुळे या देशातून होणारी सुमारे ५० अब्ज डॉलरची निर्यात कमी झाली आहे. चीनमधून जगभरातील अनेक देशांना सुटे भाग पुरविले जातात. त्यांची निर्यात बंद झाल्याने अर्थव्यवस्थांना फटका बसत आहे. अनेक देशांमधील उत्पादनप्रक्रिया मंदावली आहे.

टॅग्स :कोरोनाअर्थव्यवस्था