Join us  

शेअर बाजारातही कोरोनाचा कहर, गुंतवणुकदारांचे चार लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:31 AM

corona virus effect on stock markets : कोरोनाच्या दहशतीमुळे चीनसह इतर देशांमधील व्यापार ठप्प झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झाला असून, त्याचे प्रतिबिंब जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे.

मुंबई - चीनमध्ये सुरुवात होत जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारो जणांचा बळी गेला आहे.  कोरोना विषाणूचा फटका आता जगभरातील अर्थव्यवस्थांना बसत आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे चीनसह इतर देशांमधील व्यापार ठप्प झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थांवर विपरित परिणाम झाला असून, त्याचे प्रतिबिंब जगभरातील शेअर बाजारांवर दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरात अमेरिकेच्या डाऊ जोन्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये उमटत आहेत. भारतीय शेअर बाजारालाही या जागतिक घसरणीचा फटका बसला असून, सेंसेक्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. आज बाजार सुरू झाल्यावर सुरुवातीच्या काही काळातच सेंसेक्स ११०० अंकांनी घसरला. त्यामुळे काही वेळातच गुंतवणुकदारांचे सुमारे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.  

 आज आठवड्यातील शेवटच्या दिवशी बाजार उघडून व्यवहारांना सुरुवात झाल्यापासूनच सर्वच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. त्यामुळे बहुतांश शेअर्ससमोर लाल चिन्ह दिसत होते. टेक महिंद्रा आणि टाटा स्टीलच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

दरम्यान वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती गुंतवणुकदारांना सतावत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम दीर्घकाळ टीकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये ०.३ टक्क्यांनी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे चीनमधून होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सोबतच मालाची आयात करणाऱ्या देशांच्या निर्यातीवरही विपरित परिणाम होणार आहे.

संबंधित बातम्या 

कोरोनामुळे सौदीने पवित्र स्थळांची यात्रा केली स्थगित

कोरोनाच्या भारताला झळा; चीनमधून होणाऱ्या आयातीला फटका

इराणच्या उपराष्ट्रपतींनाही कोरोनाची लागण; WHO ने दिले नियंत्रणाचे संकेत

भारतीय शेअर बाजारामध्येही गेल्या सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरू असून, सलग सहा सत्रात झालेल्या विक्रीमुळे गुंतवणुकदारांचे सुमारे १० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांककोरोनाअर्थव्यवस्था