Join us  

Corona virus : शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे तब्बल 8 लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:12 AM

मुंबई शेअर बाजार म्हणजेच BSE मार्केटमधील सर्वच्या सर्व 30 शेअर लाल अंकात होते.

मुंबई - शेअर बाजारात सेन्सेक्सची मोठी घसरण झाली आहे. जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोनाने भारतातही प्रवेश केला आहे. विशेषत: आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर झाला असून मुंबई शेअर बाजारात तब्बल 1864 अंकांची घसरण झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीला 1600 अंकांएवढी मोठी घसरण झाल्याने निर्देशांक 34000 अंकावर पोहोचला होता. त्यानंतर, 33,833 अंशांपर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजारातही 500 अंकांची घसरण होऊन तो 10 हजारांच्या खाली पोहोचला आहे.

मुंबई शेअर बाजार म्हणजेच BSE मार्केटमधील सर्वच्या सर्व 30 शेअर लाल अंकात होते. तर टाटा स्टीलची सर्वाधिक 9 टक्के घसरण झाल्याची पाहायला मिळाली. तसेच, एशियन पेंट्सचे शेअरही 2 टक्क्यांनी घसरले आहेत. दरम्यान, बुधवारी मुंबई शेअर बाजार बंद झाला तेव्हा निर्देशांक, 35,697 एवढा होता. आज सकाळी बाजार खुला झाला, तेव्हा जवळपास 1600 अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर हा शेअर बाजार आणखी घटला होता. एकूणच शेअर बाजार गडगडल्याने गुंतवणूकादारांचे तब्बल 8 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रुपये बुडाले आहेत. 

भारतीय शेअर मार्केटप्रमाणेच अमेरिकेतही शेअर बाजार कोसळला आहे. अमेरिका शेअर बाजारात निर्देशांक 1400 अंकांनी कोसळल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बुधवारी 23,553 अंशावर निर्देशांक बंद झाला. डाऊ जोन्सची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :निर्देशांकमुंबईव्यवसायटाटा