Join us  

कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला वित्तीय संकटानंतरचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:39 AM

२०१९ मध्ये २.९ टक्के असलेला जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर २०२० मध्ये घसरून २.४ टक्के होण्याची शक्यता असल्याचेही ओईसीडीने नमूद केले आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला वित्तीय संकटानंतरचा सर्वांत मोठा धोका निर्माण झाला आहे, असे आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) म्हटले आहे. २०१९ मध्ये २.९ टक्के असलेला जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर २०२० मध्ये घसरून २.४ टक्के होण्याची शक्यता असल्याचेही ओईसीडीने नमूद केले आहे. ओईसीडीचे मुख्य अर्थतज्ज्ञ लॉरेन्स बून यांनी सांगितले, व्यापार आणि राजकीय तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था आधीच कमजोर झालेली आहे. कोरोना विषाणूने तिला आणखी दणका दिला आहे.जागतिक व्यापार संघटनेनेही कोरोना विषाणूचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल, असे म्हटले आहे. ओईसीडीने आपल्या ‘अंतरिम आर्थिक आढाव्या’त म्हटले आहे की, चीनमधील मंदीचा परिणाम आता जगभरात दिसू लागला आहे. पुरवठा साखळी, प्रवास आणि वस्तू बाजारपेठा याबाबतीत चीनचे महत्त्व कसे वाढलेले आहे, याचे प्रतिबिंब यातून मिळते. इतर देशांतील साथीचाही असाच परिणाम दिसून येत आहे. फक्त त्यांचा आकार छोटा आहे.पॅरिसस्थित संघटनेच्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे चीनवरही गंभीर परिणाम दिसून येत आहेत. सुधारणेच्या मार्गावर असलेल्या चीनचा २०२१ साठीचा वृद्धीदर ६ टक्के अनुमानित होता. तो आता ५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. चीनमधील उत्पादन घसरून पूर्वपदावर येताना दिसत आहे.>या देशांना मोठा फटकाअहवालात म्हटले आहे की, कोरोना विषाणूमुळे आत्मविश्वास, वित्तीय बाजार, प्रवास क्षेत्र आणि पुरवठा साखळी यावर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे २०२० मध्ये जी२० अर्थव्यवस्थाही घसरणीला लागल्या आहेत. विशेषत: चीनशी घनिष्ठ संबंध असलेल्या जपान, कोरिया आणि आॅस्ट्रेलिया यांसारख्या अर्थव्यवस्थांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

टॅग्स :कोरोना