Join us  

Corona effect : स्विगी १००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, मागणीत ६० टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 5:08 PM

Corona effect : ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आपल्या १००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. भारतात सुद्धा ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

या लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रावर परिणाम होत आहे. तसेच, अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची नोकरी सुद्धा धोक्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात केल्याचे समोर येत आहे. यातच आता ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आपल्या १००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची शक्यता आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटामुळे स्विगीच्या मागणीत ६० टक्के घसरण झाली आहे. स्विगी कंपनीने याबाबत दुजोराही दिला आहे. मात्र, कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येचा खुलासा केला नाही आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कंपनी भाडे कमी करण्यासाठी आपल्या क्लाउड किचनचा अर्धा भाग बंद करण्याची शक्यता आहे.

नॅशनल रेस्टॉरंट एसोशिएशन ऑफ इंडियाने (NRAI)लॉकडाऊनच्या काळात मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली आहे. अशातच स्विगीद्वारे कर्मचारी कपात करण्याचे वृत्त आहे. NRAI च्या अंदाजानुसार, झोमॅटो, स्विगी यांसारख्या डिलिव्हरी चेनचा व्यवसाय घसरण होऊन ९० टक्क्यांवर आला आहे. यामुळे ५ लाख सदस्यांना २०२० मध्ये ८० हजार कोटींचे नुकसान होऊ शकते.

देशात ९० टक्के रेस्टॉरंट लीजवर घेतलेल्या जागेवर चालतात. जवळपास २० टक्के असे संघटित रेस्टॉरंट मॉल्समध्ये आहेत. याशिवाय, इतर शहरांमध्ये मुख्य परिसरातीत रस्त्यांवर आहेत. या रेस्टॉरंटना आपल्या कमाईतील १५ ते ३० टक्के भाडे द्यावे लागते.

मॉलमध्ये असलेल्या रेस्टॉरंटसाठी अतिरिक्त ५ ते ६ टक्के मेंटेनेन्स चार्ज द्यावा लागतो. हा मेंटेनेन्स चार्ज अनेकदा ३००० स्वेअर फूटच्या रेस्टॉरंटसाठी २.५ लाखापर्यंत महिन्यासाठी होते. लुल्लू ग्रुप, लोढा ग्रुप, फोरम आणि वेगास यांसारख्या अनेक मोठ्या मॉल मालकांनी काही काळासाठी भाडे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यास्विगीव्यवसाय