लुटण्याच्या उद्देशाने दोघांवर गोळीबार श्रीरामपूरमधील घटना : जखमींची प्रकृती स्थिर
By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST
(जखमी औरंगाबादचे आहेत)
लुटण्याच्या उद्देशाने दोघांवर गोळीबार श्रीरामपूरमधील घटना : जखमींची प्रकृती स्थिर
(जखमी औरंगाबादचे आहेत)-----------------------श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : तालुक्यातील उंदिरगाव-नाऊर रस्त्यावर नाऊर शिवारात सोमवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी लुटण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याने दोघे जखमी झाले. त्यांच्यावर श्रीरामपूरच्या साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, विकास निवृती निकम व भाऊसाहेब निकम (रा. उक्कलगाव, ता. वैजापूर) हे दोघे उंदिरगाव येथे पाहुण्यांकडे आले होते. येथील काम आटोपून सायंकाळी आठच्या सुमारास ते मोटारसायकलवरून जात असताना नाऊरजवळ रामपूर शिवारात लाल रंगाच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तिघांनी गाडी आडवी घालून त्यांना अडवले. परंतु प्रसंगावधान राखून निकम बंधुंनी दुचाकी रस्त्याच्या खाली उतरवत वेगाने पुढे नेली. त्यामुळे अज्ञात तिघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यातील एकाने रिव्हॉल्व्हवरमधून दोन गोळ्या झाडल्या असता मोटारसायकलवरील भाउसाहेब निकम यांच्या हाताच्या पंजावर गोळी लागून ती विकास निकम यांच्या दंडात घुसली. हल्लेखोर मात्र लगेच पसार झाले. जखमींनी नाऊर येथे त्यांचे मामा कचरु शिंदे यांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले व जखमी निकम बंधुंना दवाखान्यात हलवले. कामगार रूग्णालयात शस्त्रक्रिया करुन दंडात घुसलेली बंदुकीची गोळी बाहेर काढण्यात आली. जखमींची प्रकृती स्थिर आहे. भाऊसाहेब निकम यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी अज्ञात तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)