Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्वीस बँकेतील पैशाबाबत भारताला सहकार्य करणार

By admin | Updated: January 23, 2016 03:42 IST

भारताशी व्यापारामध्ये द्विपक्षीय संबंध भक्कम असून संशयित काळ्या पैशाबाबतची माहिती देण्याचे प्रकरण योग्य पातळीवर असल्याचे स्वीत्झर्लंडचे अर्थमंत्री उली मावुरेर यांनी सांगितले.

दाओस : भारताशी व्यापारामध्ये द्विपक्षीय संबंध भक्कम असून संशयित काळ्या पैशाबाबतची माहिती देण्याचे प्रकरण योग्य पातळीवर असल्याचे स्वीत्झर्लंडचे अर्थमंत्री उली मावुरेर यांनी सांगितले. दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीत्झर्लंड भेटीचे निमंत्रण दिले असल्याचे त्यांनी शुक्रवारी मुलाखतीत सांगितले. त्यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली. काळ्या पैशांसदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही करविषयक माहिती देण्याची तयारी यापूर्वीच दर्शविली असून ती प्रक्रिया सुरू आहे. आमचे यातील सहकार्य असेच राहील व हे प्रकरण योग्य पातळीपर्यंत पोहोचले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये प्रशासकीय पातळीवर योग्य प्रकारचे सहकार्य होते आहे. भारतीय अर्थव्यवस्था चांगली प्रगती करीत असल्याचे सांगून उली म्हणाले की, उभय देशांतील उद्योगांमध्ये चांगले सहकार्य असावे असे आम्हाला वाटते. भारताचा विकासदर चांगला असून तो असाच राहील असे आम्हाला वाटते. तुमच्या निमंत्रणानुसार यंदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीत्झर्लंड भेटीवर येतील असे तुम्हाला वाटते का? या प्रश्नावर ते म्हणाले, मला आशा आहे. तो आमचा बहुमान असेल.