Join us

आता बीटी कपाशी बियाणांच्या दरावर सरकारचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2015 22:46 IST

बीटी कपाशीच्या बियाणांच्या, तसेच तत्सम बाबींच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी मार्च २०१६ पासून समान रूपात कमाल विक्री मूल्य निश्चित केले जाईल

नवी दिल्ली : बीटी कपाशीच्या बियाणांच्या, तसेच तत्सम बाबींच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी मार्च २०१६ पासून समान रूपात कमाल विक्री मूल्य (एमआरपी) निश्चित केले जाईल. सरकारचे हे पाऊल मोनसॅन्टो यासारख्या जागतिक संकरित बियाणे कंपन्यांसाठी मोठाच झटका मानला जात आहे.याबाबत कृषी मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, बियाणांचे मूल्य आणि रॉयल्टी किंवा प्रजाती मूल्य (ट्रेट व्हॅल्यू) सह परवाना शुल्काची निश्चिती आणि नियमन करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. सध्या देशाच्या विविध भागांत बीटी कपाशीचे बियाणे वेगवेगळ्या दरात विकले जात आहे. पंजाब आणि हरियाणात या बियाणाच्या ४५० ग्रॅम पाकिटाचे मूल्य १ हजार रुपये, तर महाराष्ट्रात ८३० रुपये, आंध्र प्रदेशसह सहा राज्यांत ९३० रुपये आहे.सात डिसेंबर रोजी जारी केलेल्या या अधिसूचनेत कृषी मंत्रालयाने म्हटले आहे की, जीनसंवर्धित विद्यमान आणि भविष्यात येणाऱ्या कपाशीचे बियाणे अन्य कापूस बियाणांचे मूल्य एकाच स्वरूपात राहावे यासाठी कपाशी बियाणे दर (नियंत्रण) आदेश जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे निष्पक्ष, योग्य आणि स्वस्त मूल्यावर उपलब्ध करण्यासाठी, तसेच या बियाणांचे दर देशभर सारखेच ठेवण्याचा सरकारचा उद्देश आहे.या अधिसूचनेनुसार कपाशीच्या बियाणाची एमआरपी ३१ मार्च किंवा त्यापूर्वी सरकारी राजपत्रात अधिसूचित केली जाईल.