प्रसाद जोशी -
संसदेला सादर झालेला रेल्वेचा अर्थसंकल्प, त्यापाठोपाठ जाहीर झालेले आर्थिक सर्वेक्षण, फेब्रुवारी महिन्याच्या फ्युचर्स आणि आॅप्शन्स व्यवहारांची सौदापूर्ती अशा विविध घटनांमुळे बाजारात चांगलीच हालचाल दिसून आली. रेल्वेच्या अर्थसंकल्पाने बाजारात निराशेचे वातावरण होते. त्यापाठोपाठच्या आर्थिक सर्वेक्षणामुळे बाजारात आशादायक वातावरण निर्माण झाले. असे असले तरी सोमवारच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे डोळे लागले असल्याने बाजाराने सावध भूमिका घेतली. असे असले तरी सप्ताहामध्ये बाजारावर अस्वलाचेच नियंत्रण असलेले दिसून आले. गत सप्ताहात मुंबई शेअर बाजारामध्ये मंदीवाल्यांचाच जोर दिसून आला. सप्ताहामध्ये बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ५५५ अंशांनी खाली येऊन २३१५४.३० अंशांवर बंद झाला. आर्थिक सर्वेक्षण जाहीर झाल्यावर बाजारामध्ये थोड्या प्रमाणात तेजी आल्यामुळे निर्देशांक २३ हजार अंशांच्या वर बंद झालेला दिसून आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही १८१ अंशांची घट होऊन तो ७०२९.२५ अंशांवर बंद झाला. बाजाराचे अन्य क्षेत्रीय निर्देशांकही खाली आले आहेत.गेल्या सप्ताहामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. मात्र, बाजाराचे सगळे लक्ष दि.२९ रोजी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. यामुळे बाजारात काहीसा संथपणा आला आहे. आर्थिक सर्वेक्षणानंतर बाजारामध्ये थोडीफार तेजी दिसून आली असली तरी आधीपासून झालेल्या घसरणीमुळे सप्ताहात अस्वलाचेच साम्राज्य असलेले जाणवले.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेला सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे बाजाराची खूपच निराशा झाली. यानंतर बाजारामध्ये विक्रीची लाट दिसून आली. रेल्वेशी संबंधित असलेल्या अनेक आस्थापनांच्या समभागांची किंमत खूपच खाली आली. याच सप्ताहामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या फ्युचर्स अॅण्ड आॅप्शन्स व्यवहारांची सौदापूर्ती झाली. त्यावेळी बाजारावर विक्रीचे दडपण आले. त्यातच रेल्वे अर्थसंकल्पाने केलेली निराशा, परकीय वित्तसंस्थांनी घेतलेले थांबा आणि पहाचे धोरण तसेच काही प्रमाणात केलेली समभागांची विक्री, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे घसरते मूल्य अशा विविध बाबींमुळे बाजार खाली आला. संसदेची गेली दोन अधिवेशने विरोधकांच्या गदारोळामध्ये वाहून गेली आहेत. आर्थिक सुधारणांना गती देण्यास मोदी सरकार अपयशी ठरले आहे. आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात याबाबत काय तरतुदी असतील तसेच अर्थमंत्री चलनवाढ, अर्थव्यवस्थेचा विकासदर, तूट याबाबत काय पावले टाकतात त्यावरच बाजाराची आगामी दिशा ठरणार आहे.