Join us

अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू

By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST

कॉँग्रेसचा अध्यक्षपदावर दावा : इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू

कॉँग्रेसचा अध्यक्षपदावर दावा : इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांची शेवटची ठरू शकणारी सर्वसाधारण सभा संपताच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांनी आपापल्या परीने संबंधितांच्या भेटीगाठी सुरू केल्याचे चित्र आहे. संख्याबळानुसार अध्यक्षपद हे राष्ट्रवादी कॉँग्रेसला व उपाध्यक्षपद हे काँग्रेसला देण्यात येणार असले तरी काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे.
विद्यमान उपाध्यक्ष व त्र्यंबकेश्वर कॉँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे इतर मागास संवर्गासाठी आरक्षित असल्याने आणि या संवर्गातील महिला कॉँग्रेसकडे असल्याने यावेळी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद हे त्र्यंबकेश्वर तालुक्याला मिळावे,अशी मागणी केली आहे. येत्या २१ सप्टेंबरला विद्यमान अध्यक्ष जयश्री पवार व उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांचा नियोजित अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असून, २१ सप्टेंबरपूर्वी नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वाधिक संख्याबळ २७ असून, त्या खालोखाल शिवसेनेचे २० तसेच कॉँग्रेसचे १४ तर भाजपाचे ४, माकपचे तीन, तीन अपक्ष, व दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा परिषद सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर मागास संवर्गातील महिला प्रामुख्याने मंदाकिनी दिलीप बनकर, संगीता राजेंद्र ढगे,माधुरी महेंद्र बोरसे,किरण पंढरीनाथ थोरे,विजयश्री रत्नाकर चुंबळे, सिंधूबाई संजय सोनवणे तसेच विद्यमान सभापती ज्योती बाळासाहेब माळी या असून, कॉँग्रेसकडून निर्मला गिते तर शिवसेनेकडून भावना भंडारे या अध्यक्षपदाच्या उमेदवार होऊ शकतात. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीची गणिते पाहता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्षपदाचा उमेदवार लोकसभेची कामगिरी पाहूनच ठरविला जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विषय समिती सभापती पदासाठी प्रामुख्याने शैलेश सूर्यवंशी, बाळासाहेब गंुड, प्रवीण गायकवाड, प्रकाश वडजे, इंदुमती खोसकर, गोरख बोडके, यतिन पगार, उषा बच्छाव यांची नावे चर्चेत आहेत. तर कॉँग्रेसकडून प्रा. अनिल पाटील, डॉ. प्रशांत सोनवणे, केरू पवार, इंदुताई गवळी, शीला गवारे, कल्पना सूर्यवंशी, ॲड. संदीप गुळवे, सोमनाथ फडोळ यांची नावे चर्चेत आहेत.(प्रतिनिधी)