Join us

पंढरपुरातील सरगम चित्रपटगृहामध्ये ग्राहकांची लूट पार्किंगच्या नावाखाली घेतले जातात पैसे; कोणतीही जबाबदारी नाही

By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST

16पंड02

16पंड02
पंढरपूर येथील सरगम चित्रपटगृहात लावण्यात आलेले फलक. (सचिन कांबळे)
पंढरपूर : येथील सरगम चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांची पार्किंगच्या नावाखाली रोज शेकडो रुपयांची चित्रपटगृहाचे मालक लूट करीत आहेत.
तालुक्यामध्ये इतर ठिकाणी चित्रपटगृह नसल्याने सर्व तालुक्यातील प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी पंढरपूरला येतात. अशातच चित्रपटगृहात कोणत्याच सुविधा नसताना चित्रपटाचे तिकीट शुल्क वाढवले आहे.
यामुळे चित्रपट शौकिनांनी सरगम चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली आहे. काही चित्रपट प्रेमी अकलूज येथे मल्टीप्लेक्स चित्रपटगृहाकडे जाणे पसंत करत आहेत.
तसेच पूर्वी सरगम चित्रपटगृहातील परिसरात वाहने पार्किंगसाठी मोटरसायकल किंवा दुचाकी वाहनासाठी 5 रुपये तर चार चाकी वाहनासाठी 10 रुपये होते. परंतु आता दुचाकी वाहनासाठी 10 रुपये व चारचाकी वाहनांसाठी 20 रुपये घेतले जातात.
आपली वाहने स्वत:च्या जबाबदारीवर लावणे, जागा भाडे घेत आहोत, वाहनासोबत कुठलीही मौल्यवान वस्तू व इतर वस्तू आणू नयेत. वाहनाच्या कुठल्याही नुकसानीस व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही. व्यवस्थापनास आपण सहकार्य करावे असा फलक लावला आहे.
चित्रपटगृहाच्या मालकाने नुकसान भरुन काढण्यासाठी पार्किंग कर वाढवला असावा. यामुळे अनेक ग्राहक वाहने पार्किंग करताना हुज्जत घालत आहेत.
पावती मिळत नाही
चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांना वाहन पार्किंग करण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी वाहनाला 10 ते 20 रुपये घेतले जातात. एवढे पैसे घेऊनही त्या वाहनांची कोणती जबाबदारी चित्रपटगृहाच्या प्रशासनाकडून उचलली जात नाही. तसेच त्या वाहनधारकाला कोणतीही पावती देखील दिली जात नाही. याबाबत चित्रपटगृहाच्या मालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते त्याठिकाणी हजर नव्हते यामुळे त्यांच्या चित्रपटगृहाच्या कामगारांनी बोलण्यास नकार दिला.