Join us

ग्राहकांची अडवणूक ; सर्वसामान्य झाले त्रस्त

By admin | Updated: November 10, 2016 04:48 IST

केंद्र सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, ग्राहकांअभावी बाजारपेठा ठप्प झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले

प्रसाद जोशी, नाशिककेंद्र सरकारने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, ग्राहकांअभावी बाजारपेठा ठप्प झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. काही ठिकाणी व्यावसायिकांकडून ग्राहकांची अडवणूक होत असल्याचे दिसून आले. बुधवारी बँका व एटीएम बंद असल्यामुळे अनेकांकडे पुरेसे पैसे नव्हते. सकाळपासून मोठ्या नोटांऐवजी १०० रुपयांच्या नोटा मिळविण्याचे नागरिकांचे प्रयत्न होते. अनेक दुकानदारांनी पाचशे व हजार रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जाणार नसल्याचे फलक लावलेले होते. पेट्रोल पंपांवर दोन दिवस या नोटा चालणार असल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी ग्राहकांची अडवणूक होताना दिसून आली. संपूर्ण रकमेचे पेट्रोल घेण्याचा आग्रह केला जात होता. काही पेट्रोल पंपांवर ग्राहकांना देण्यासाठी १०० रुपयांच्या नोटाच उपलब्ध नव्हत्या. अनेक दुकानदारांनी ग्राहकांकडे सुटे पैसे असल्यासच वस्तू दिल्या जातील, असे स्पष्ट केले होते. परिणामी, बाजारात फारशी उलाढाल झालेली दिसून आली नाही.