Join us

विषय समिती बदलाची कॉँग्रेसची मागणी, राष्ट्रवादीकडून नकार

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

निधी नियोजनाच्याही झाल्या तक्रारी; कॉँग्रेसच्या दहा सदस्यांची दांडी

निधी नियोजनाच्याही झाल्या तक्रारी; कॉँग्रेसच्या दहा सदस्यांची दांडी
नाशिक : कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसची संयुक्त बैठक भुजबळ फार्म येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला कॉँग्रेसच्या १४ पैकी १० जणांची गैरहजेरी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली.
भुजबळ फार्म येथे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या उपस्थितीत आगामी २१ सप्टेंबर रोेजी होणार्‍या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीस राष्ट्रवादीचे झाडून २७ सदस्य, तर अपक्ष असलेले विजयश्री चुंबळे, सुजाता वाजे, किरण थोरे यांच्यासह कॉँग्रेसकडून उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले ॲड. संदीप गुळवे, प्रा. अनिल पाटील, डॉ. प्रशांत सोनवणे व सोमनाथ फडोळ हे चार सदस्य उपस्थित होते. जे उपस्थित होते त्यातील काहींनी कॉँग्रेसला विषय समित्यांमध्ये बदल करून द्या अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी आधी तुम्ही सर्व एकत्र या, अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक होऊ द्या, मग विषय समित्यांचे पाहू, असे सांगत ही मागणी अलगद बाजूला सारली. त्याचवेळी इंदुमती खोसकर यांनी जिल्हा परिषदेत निधी वाटपाबाबत आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखविली. त्यावेळी थोडा वेळ गांेधळ होऊन नंतर मग कोणाला काही मत मांडायचे असल्यास त्यासाठी एकेक करून सदस्यांच्या मुलाखती पालकमंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांनी घेतल्या. तत्पूर्वी कॉँग्रेसचे चारही सदस्य नेत्यांची परवानगी घेऊन निघून गेले. यावेळी निधी नियोजनाबाबत काही सदस्यांनी व पदाधिकार्‍यांनी तक्रारी केल्याचे कळते. (प्रतिनिधी)
इन्फो..
उपाध्यक्षांची दांडी
जिल्हा परिषदेत कॉँग्रेसचे १४ सदस्य असून, त्यात सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे समर्थक समाजकल्याण सभापती राजेश नवाळे, केरू पवार, ताईबाई गायकवाड व शीला गवारे यांच्यासह इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांचे समर्थक उपाध्यक्ष संपतराव सकाळे, तसेच बेबीताई माळी व निर्मला गावित यांच्यासह नांदगाव, निफाड व कळवण येथील जिल्हा परिषद सदस्य अनुपस्थित असल्याचे चित्र होते. यातील उपाध्यक्ष संपतराव सकाळे हे त्र्यंबकेश्वरला विकासकामांचे उद्घाटन असल्याने, तर राजेश नवाळे हे पंचायत समिती निवडणुकीबाबत बाहेर दौर्‍यावर असल्याने बैठकीस अनुपस्थित असल्याची चर्चा होती.