प्रशांत देसाई, भंडारामहाआॅनलाईनच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक आॅपरेटरचा करारनामा ३१ डिसेंबरला संपला. त्यांची सेवा समाप्त झाल्याने राज्यातील सुमारे २५ हजार संगणक चालकांचे पाच महिन्यांचे ५६ कोटी २५ लाख रूपयांचे मानधन थकीत आहे. त्याचा तिढा सुटण्याचा मार्ग अधांतरी असल्याने केलेल्या कामाच्या मोबदल्यापासून त्यांना वंचित राहावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.संगणक चालकांना कंपनीच्यावतीने दरमहा ४,५०० रूपये मानधन देण्यात येत होते. राज्यातील सुमारे २५ हजार आॅपरेटचे सुमारे ५६ कोटी २५ लाख रूपयांचे मानधन आॅगस्टपासून महाआॅनलाईनकडे थकीत आहे. करार पूर्ववत करण्यासाठी संगणक चालकांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशात मुद्दा रेटून धरल्यामुळे त्यांना लाठीमाराला सामोरे जावे लागले होते. शासनाने महाआॅनलाईनच्या माध्यमातून सेतू केंद्र व ग्रामपंचायतींना संगणककीकृत केल्याने तेथून दाखले मिळत होते. गावातील ग्रामपंचायतीत महाआॅनलाईनच्या माध्यमातून २०११ मध्ये राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत संगणक चालकाची नेमणूक करण्यात आली होती. ग्रामस्थांना एका क्लिकवर विविध प्रकारचे ७२ दाखले मिळत होते. मात्र, कंपनीसोबतचा करार ३१ डिसेंबरला समाप्त झाल्यामुळे आतापर्यंत संगणकीकृत कामे होणाऱ्या ग्रामपंचायतीतील कामे संगणक चालकांच्या सेवा समाप्तीमुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामावर परिणाम होणार असून ग्रामपंचायती आॅफलाईन झाल्या आहेत. त्यामुळे या विभागाचे काम कोण व कसे करणार याबाबत अद्याप कोणतीही सूचना ग्रामपंचायतीला मिळालेली नाही.
संगणकचालकांचा करार संपला : ग्रामपंचायतींवर आॅफलाईनची नामुष्की
By admin | Updated: January 4, 2016 02:27 IST